माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:52+5:302021-07-19T04:19:52+5:30
हिंगोली : आषाढ महिन्यात नवविवाहिता या आपल्या माहेरी जातात. आषाढ महिन्यात माहेरी गेल्यानंतर पंचमी सण साजरा करून सासरी येतात; ...
हिंगोली : आषाढ महिन्यात नवविवाहिता या आपल्या माहेरी जातात. आषाढ महिन्यात माहेरी गेल्यानंतर पंचमी सण साजरा करून सासरी येतात; परंतु, या वर्षी कोरोनामुळे नवविवाहितांना माहेरी जाता येईनासे झाले आहे.
आषाढ महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे विवाहकार्य करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागात तर विवाह करण्यासाठी कोणतीच व्यवस्थाही नसते. त्यामुळे पूर्वीपासून आषाढ महिना हा विवाहकार्यासाठी वर्ज्यच मानला जातो; परंतु, गत दीड वर्षापासून कोरोनाने सळो की पळो करून सोडले असल्यामुळे या वर्षीही आषाढ महिन्यातसुद्धा विवाहकार्य आटोपून घेतले जात आहे. पंचांगकर्त्यांनी आषाढ महिन्यात दोन मुहूर्त काढले आहेत. यात मुख्यकाल व आपत्काल या मुहूर्तांचा समावेश आहे. आषाढात १३, १८, २२, २५, २६, २८ आणि २९ जुलै अशा तारखा आहेत.
नवविवाहित मुलींच्या आई म्हणतात...
गत दीड वर्षापासून सर्वकाही बदलून गेले आहे. आषाढ महिन्यात पूर्वी लग्न करीत नसत; परंतु, कोरोनामुळे आषाढ महिन्यातही ते करावे लागत आहे. विवाह झाल्यानंतर मुलीला माहेरी बोलावून घेतले जाते. ही पूर्वापर परंपरा आहे. आषाढ महिन्यात मुलगी घरी आल्यास तिला पंचमीपर्यंत ठेवून घेतले जाऊन गोडधोडही खाऊ घातले जाते, असे नवविवाहितेच्या आईने सांगितले.
आषाढ महिना विवाहकार्यासाठी वर्ज्य असला तरी कोरोनामुळे आषाढ महिन्यातही मुख्य काल व आपत्काल पाहून मुहूर्त काढले जात आहेत. गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी सोडले तर मोठे सण नाहीत. आषाढात मुलीला माहेरी आणले तर श्रावण महिन्यापर्यंत ठेवून घेऊन पंचमी सण साजरा करून सासरी पाठविले जाते, असे आईने सांगितले.
नवविवाहिता म्हणते...
नवविवाहितांसाठी आषाढ महिना हा महत्त्वाचा आहे. नवविवाहितेला आषाढ महिन्यापासून माहेरची ओढ लागते. लग्नानंतर नवविवाहिता प्रथमच माहेरी जाते. यानंतर पंचमीचा सणही ती मोठ्या उत्साहाने साजरा करते. पंचमीचा झोका घेऊन ती आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा साजरी नांदायला जाते, असे नवविवाहितेने सांगितले.
गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे नवविवाहितेला सणही साजरे करता येत नाहीत. नवविवाहिता आषाढीला माहेरी गेल्यानंतर साधारणत: पंधरा दिवसांपर्यंत म्हणजे पंचमीपर्यंत माहेरी थांबते. त्यानंतर सासरचे बोलावणे आले की, आनंदाने सासरी जाते. परंतु, कोरोनामुळे काही नवविवाहितांना आपल्या सासरीच सण साजरे करावे लागत आहेत, असे नवविवाहितेने सांगितले.
असे होते विवाह मुहूर्त...
एप्रिल महिन्यामध्ये ८, मे महिन्यामध्ये १६, जून महिन्यामध्ये ८ आणि जुलै महिन्यामध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये ७ मुहूर्त होते. धुमधडाक्यात साजरे होणारे विवाहकार्य कोरोना महामारीमुळे साध्या पद्धतीनेच साजरे करावे लागले. या दरम्यान, वधूपिता, वरपिता व वऱ्हाडी मंडळींना जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करून विवाहकार्य करावे लागत आहे.