अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार ‘अन्नत्याग’ आंदोलन

By विजय पाटील | Published: December 7, 2023 04:42 PM2023-12-07T16:42:41+5:302023-12-07T16:42:53+5:30

मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून सरसकट कर्जमाफीची केली मागणी

Even offer the organs for sale does not matter; Farmers of Goregaon will now carry out 'Annatyaga' movement | अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार ‘अन्नत्याग’ आंदोलन

अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार ‘अन्नत्याग’ आंदोलन

हिंगोली : बँक कर्ज परतफेडीसाठी किडनी, डोळे, लिव्हर, विक्रीला काढूनही शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता परंत मुंबईहून परतलेल्या त्या शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी करीत अन्नत्याग आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सेनगाव तालुक्यातील गोेरेगाव व परिसरात यंदा खरीप हंगामात पावसाचा खंड व ‘येलो मोझॅक’ सारख्या रोगामुळे पिकांचे प्रंचड नुकसान झाले. परिणामी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात उत्पन्न घट झाली. परंतु कुठल्याही प्रकारची सरकारी मदत किंवा पिकविमा परताव्याचा लाभ मिळाला नाही. त्यात सोयाबीन व कापूस पिकाला योग्य भावही मिळत नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर बँक कर्ज फेडायचे कसे ? असा प्रश्न उभा राहिला आहे. यास कंटाळून गोरेगावसह परिसरातील दहा शेतकऱ्यांकडून अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. गत महिन्यात अवयव विक्री आंदोलनासाठी संबंधित शेतकऱ्यांनी मुंबई गाठली होती. दरम्यान त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या निमंत्रित करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

७ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. यामध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी ८ डिसेंबरपासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सदर निवेदनावर गजानन कावरखे, रामेश्वर कवरखे, मदन कावरखे, सुनील मधुरवाड, संजय मुळे, अक्षय पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अवयव विक्रीवरही ठाम ...
सततच्या दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात होरपळला जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्याच्या घटना घडत आहेत. बिकट परिस्थिती बघता शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे. पिकविमा, शेतमाला योग्य भाव तसेच सरसकट कर्जमाफी आदी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल. बँक कर्ज परतफेडीसाठी अवयव विक्रीवरही आम्ही ठाम असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Web Title: Even offer the organs for sale does not matter; Farmers of Goregaon will now carry out 'Annatyaga' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.