सीबीनॅटद्वारे १००३ रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:41 AM2018-03-06T00:41:59+5:302018-03-06T00:42:03+5:30
जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले.
पूर्वी संशयित क्षयरोग रूग्णांची थुंकी तपासण्यासाठी रूग्णांना मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत असे. त्यामुळे रूग्णाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागे. शिवाय उपचार सुरू होण्यासही वेळ लागे. मात्र आता सीबनेटद्वारे दोन तासांतच क्षयरोगाचे निदान होत आहे. त्यामुळे रूग्णांवरत तत्काळ उपचार करण्यास मदत होत आहे. क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे. जिल्हा रूग्णालयातील सीबीनेट यंत्राद्वारे क्षयरोगाचे लवकर निदान होण्यास मदत होत आहे. त्यामुळे रूग्णांना तात्काळ व वेळेत उपचार मिळत आहेत. अत्याधुनिक यंत्राद्वारे वर्षभरात १००३ संशयित क्षयरोग रूग्णांची यंत्राद्वारे तपासणी केली. पूर्वी दुर्धर समजला जाणारा, क्षयरोग पूर्णत: बरा होणारा आजार आहे. जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रामार्फत क्षयरोगाचा प्रसार वाढू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. क्षयग्रस्त रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून शहरासह ग्रामीण भागात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातआहे.
ड्रग रेजीस्टंट १८ क्षयरूग्ण आढळून आले आहेत. हे रूग्ण क्षयरोगाच्या नेहमीच्या उपचार पद्धतीस प्रतिसाद देत नाहीत. त्यासाठी अशा रूग्णांना जास्त कालावधीचा उपचार द्यावा लागतो असे डॉक्टरांनी सांगितले. क्षयग्रस्त रूग्णांना पूर्वी आठड्यातून ३ वेळेस डोस द्यावा लागे. परंतु आता हा डोस डॉक्टरांच्या सल्यानुसार दरदिवशी दिला जात आहे. नियमित औषधांचे सेवन आरोग्याची काळजी घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेला डोस वेळेत घेणे महत्वाचे आहे. असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.
९८५ रूग्णांचा शोध उपचार पद्धती
४शहरासह ग्रामीण भागात क्षयरोग रूग्णांचा आरोग्य यंत्रनेद्वारे शोध घेतला जातो. त्यांना दिलेला डोस वेळेवर घेतला जातो किंवा नाही, तसेच औषोधोपचार पुरवठा केला जातो. जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत गतवर्षी ९८५ क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.