पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 02:23 PM2020-10-11T14:23:36+5:302020-10-11T14:24:22+5:30
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनचे ढिगारे भिजत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कळमनुरी : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनचे ढिगारे भिजत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी ढिगारे कापडाने झाकून ठेवली होती, परंतु जमिनीला ओल येऊन पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत.
कळमनुरी तालुक्यात ५२ हजार ६९५ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधिक पेरा होतो. सोयाबीनमध्ये पाणी शिरत असल्याने सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. तालुक्यात ७४ हजार १७३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये कापूस लागवड ८ हजार १४० हेक्टरवर झाली आहे. सध्या कापूस फुटलेला असून यामध्ये पाणी झाले आहे, कापसाची बोंडे ओली चिंब झाली आहेत. तसेच ज्वारीचा पेरा १ हजार २७५ हेक्टरवर असून सततच्या पावसामुळे ज्वारी काळी पडली आहे.
परिसरातील कयाधू नदी भरून वाहत आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सर्वे करण्याच्या सूचना तहसिलदारांनी तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांना दिल्या आहेत. सध्या नुकसानीचा सर्वे सुरू आहे. सोयाबीन कापणीच्या वेळी पाऊस पडत असल्यामुळेशेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी अगोदरच सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे दुबार व तिबार पेरणी करावी लागली होती. त्यामुळेही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. त्यात आता पुन्हा पावसाने संकटांचे ढग अधिकच गडद केले आहेत.