खळबळजनक! आंबाचोंडी रेल्वे स्टेशनजवळ भरदिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून
By यशवंत भीमराव परांडकर | Updated: July 18, 2024 19:02 IST2024-07-18T18:59:25+5:302024-07-18T19:02:38+5:30
गावातील तरुणांतील वादाचे रूपांतर नंतर एकास चाकू भोसकण्यापर्यंत गेले

खळबळजनक! आंबाचोंडी रेल्वे स्टेशनजवळ भरदिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून
- इब्राहीम जहागिरदार
कुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील आंबाचोंडी येथील रेल्वे स्टेशनजवळ १८ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाच्या पोटात चाकूचे वार केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या तरुणास अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविले. परंतु गंभीर जखमी असलेल्या तरुणाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
आंबाचोंडी येथे किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव सतीश सुरेश भोसले (वय २८) आहे. चोंडी रेल्वे स्टेशन जवळ भर दिवसा सदर तरुणासोबत गावातील काही तरुणांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर चाकू भोसकण्यापर्यंत गेले असल्याचे सांगण्यात येते. या खुनाच्या घटनेमुळे कुरुंदा व परिसरात खळबळ उडाली असून, नेमका कोणत्या कारणातून खून केला हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात, सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, फौजदार आडे, श्रीधर वाघमारे, जमादार बालाजी जोगदंड, इमरान सिद्धीकी आदींनी भेट दिली. या घटनेसंदर्भात पोलिस तपास करीत आहेत. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.