पाणीटंचाईमुळे शाळा दिली सोडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:48 AM2019-07-24T11:48:46+5:302019-07-24T12:23:54+5:30
शाळा समिती अध्यक्षांचा आदेश
- रामा सारंग
हयातनगर (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील हयातनगर येथे पाणीटंचाईला त्रासलेल्या शाळा समिती अध्यक्षाने मंगळवारी चक्क शाळा सोडून देण्याचे आदेश मुख्याध्यापकांना दिले. पाठोपाठ मुख्याध्यापकांनी दुपारी एक वाजताच शाळा सोडून दिली. या घटनेची दिवसभर चर्चा होती.
हयातनगर येथे जिल्हा परिषदेचे पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून प्राथमिक व माध्यमिक शाळा वेगळी आहे. शाळेची टोलेजंग इमारतही आहे. मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. मागील काही महिन्यांपासून अशीच स्थिती आहे. शाळेत दोन बोअर असून एकाच बोअरवेलमध्ये विद्युत मोटार आहे. त्यालाही पाणी येत नाही. एक हातपंप आहे. तोही कोरडा आहे. काही दिवस शिक्षकांनी स्वखर्चाने पाणी विकत आणून विद्यार्थ्यांची तहान भागविली. परंतु, परिसरात दमदार पाऊस न झाल्याने पाणी टंचाई कायम आहे. जिल्हा परिषदेची शाळा गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. विद्यार्थ्यांना गावात जिथे मिळेल तिथे पाणी प्यावे लागते किंवा घरी जावे लागते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दररोज चार वाजता सुटणारी शाळा मंगळवारी अचानक दुपारी एक वाजताच सुटली. त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
संतापलेल्या ग्रामस्थांनी मुख्याध्यापक साहेबराव नरवाडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘शाळेत पाणी नसेल तर विद्यार्थ्यांना सोडून द्या असे आदेश शाळा समितीच्या अध्यक्षांनी आम्हाला फोनवर दिला. म्हणून शाळा सोडून दिली.’ शाळेतील पाण्याचे नियोजन काय आहे ते शाळा समिती बघून घेईल आणि उपाय-योजनाही करेल, अशी प्रतिक्रिया सरपंच शांताबाई सारंग यांनी दिली. यासंदर्भात वारंवार प्रयत्न करूनही शाळा समिती अध्यक्ष सुनीता माधवराव सारंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
गावकऱ्यांनी केली वर्गणी
शाळेत पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मंगळवारी गावकऱ्यांनीच पुढाकार घेतला. लक्ष्मणराव सारंग व भगवानआप्पा राऊत यांनी काही वर्गणी करून शाळेत खाऊ शिजवणारे चंद्रकांत क्षीरसागर यांच्याकडे दिली. याशिवाय आणखीही मदत केली जाईल, असे शिवराम सोळंके व विठ्ठल महाराज गिरी म्हणाले. नेमकी किती वर्गणी दिली हे मात्र सांगण्यास त्यांनी नकार दिला.
शाळा सोडण्याचा अधिकार अध्यक्षांना नसतो
हयातनगर शाळेतील पाणी प्रश्नासंदर्भात मी उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. शाळेत पाणीटंचाई निर्माण झाल्यास शालेय समितीचे अध्यक्ष तसेच मुख्याध्यापकांनी उपाययोजना करणे आवश्यक आहेत. परस्पर शाळा सोडून देण्याचे आदेश समितीच्या अध्यक्षाला नसतात.
- नवनाथ थोरात,गटशिक्षणाधिकारी (वसमत)