हार्वेस्टर चालकांकडून पिळवणूक
By admin | Published: March 4, 2015 03:41 PM2015-03-04T15:41:51+5:302015-03-04T15:41:51+5:30
सलग /दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गहू काढणीचे काम मळणीयंत्राद्वारे करण्यासाठी शेतकर्यांची धांदल उडाली आहे.
गजानन हमाणे /कडोळी
सलग /दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गहू काढणीचे काम मळणीयंत्राद्वारे करण्यासाठी शेतकर्यांची धांदल उडाली आहे. अशा स्थितीत काही शेतकरी गहू काढणी लवकर उरकण्यासाठी कंबाईन हार्वेस्टर यंत्राचा वापर करीत आहेत. मात्र हार्वेस्टरचालक एकरी १६00 ते १७00 रूपये घेऊन एकप्रकारे शेतकर्यांची पिळवणूक करीत आहेत.
सेनगाव तालुक्यातील कडोळी परिसरात अवकाळीने बहुतांश पिके वाया गेली आहे. ज्यांची पिके पावसाच्या तडाख्यातून वाचली ते शेतकरी गव्हाची काढणी करण्यासाठी घाईगडबड करीत आहेत. या कामासाठी मजूर मिळणे अवघड झाल्याने मागेल तेवढी मजुरी देण्याची तयारी शेतकरी दाखवत आहेत. तसेच मळणीयंत्रचालकांनीही आपले भाव वाढवले आहेत. मजूर व मळणीयंत्र चालकांकडून एकप्रकारे गरीब शेतकर्यांची अडवणूक होत असल्याचे चित्र आहे. तरीही गहू पिकाचे जास्त नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी ओलाच गहू कंबाईन हार्वेस्टरद्वारे काढून टाकत आहेत.
पंजाब राज्यातून आलेले हार्वेस्टर चालक पुर्वी गहू कापणी व काढणीच्या कामासाठी एकरी १२00 रूपये घेत असत. आता शेतकर्यांची गरज असल्याने त्यांनीही दर वाढवले असून एकरी १६00 ते १७00 रूपये दर केले आहेत.मजुरांची उपलब्धता कमी तसेच कापणी व मळणीवरील होणारा खर्च लक्षात घेता अलीकडच्या काळात शेतकर्यांचा कल कंबाईन हार्वेस्टरने गव्हाची कापणी करण्याकडे वाढला आहे.
या मशीनने गव्हाची कापणी व मळणी एकाच वेळी होते. त्याचप्रमाणे यासाठी वेळही कमी लागतो. ही बाब ध्यानात घेऊन कडोळी परिसरातील अनेक शेतकर्यांनी पाऊस व गारपिटीच्या भीतीने कमी वेळामध्ये गव्हाचे पीक काढण्यासाठी हार्वेस्टर वापरण्यास सुरूवात केली आहे. मात्र त्यासाठी जादा दर आकारला जात असून नाईलाजाने शेतकर्यांना तो द्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.