मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात दोन युवकांनी संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:58 PM2024-09-23T12:58:11+5:302024-09-23T12:59:43+5:30

ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले.

Extreme step for Maratha reservation; Two youths ended their lives in Marathwada | मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात दोन युवकांनी संपवले जीवन

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात दोन युवकांनी संपवले जीवन

वसमत/ बदनापूर: मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा पेटले असून मराठवाड्यात याचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहेत. दरम्यान, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात दोन युवकांनी ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले आहे. 

वसमत तालुक्यातील मुडी येथील साईनाथ सखाराम पडोळे ( २६ ) युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. ''मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, शासन मराठा समाजाला आरक्षण देवू इच्छित नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे'', अशी सुसाइड नोट आढळून आली आहे. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आला असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे यांनी दिली आहे.

बदनापूर तालुक्यातील वरुडी येथील दादाराव रंगनाथ काकडे ( ४०) या युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवल्याची घटना रविवारी मध्यरात्री उघडकीस आली. दादाराव यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केले की, ''मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील एक वर्षापासून उपोषण करून लढा देत आहेत. तरी सरकार याकडे लक्ष देत नाही.'' 

मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका
छावा संघटनेचे देवकर्ण वाघ म्हणाले की, दादाराव या युवकाच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पडल्याने त्याने आत्महत्या केली. आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. तसेच सरपंच राधाकिसन शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षण मिळत नसल्याने व्यथित झालेल्या दादाराव यांनी आरक्षणासाठी जीवन संपवणार असल्याचे अनेकदा सहकाऱ्यांना सांगितले होते.

Web Title: Extreme step for Maratha reservation; Two youths ended their lives in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.