हे तर पोलिसांचे अपयश; ६४ टक्के आरोपी सुटतात निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:41+5:302021-08-27T04:32:41+5:30
हिंगोली : एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा सखोल तपास करणे, दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे तसेच सरकारी वकिलाच्या मदतीने गुन्हेगाराला अधिकाधिक ...
हिंगोली : एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा सखोल तपास करणे, दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे तसेच सरकारी वकिलाच्या मदतीने गुन्हेगाराला अधिकाधिक शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे काम तपासी पोलीस अधिकाऱ्याचे असते. हिंगोली जिल्ह्यात आरोपीला शिक्षा होण्याचे प्रमाण गतवर्षीपेक्षा यावर्षी ४ टक्क्याने वाढले असले तरी गुन्ह्यातून निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाणही खूप आहे.
जुलै २०२१ पयर्यंत २२ प्रकरणापैकी ४ प्रकरणात आरोपीला शिक्षा झाली आहे. तर तब्बल १८ प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले आहेत. गुन्ह्याचा सखोल तपास केला नसल्यानेच आरोपीला गुन्ह्यातून निर्दोष सुटण्यास संधी मिळाल्याचा आरोप केला जात आहे. मागील दोन वर्षांपासून हिंगोली पोलिसांची कामगिरी सरस होत असली तरी गुन्हा घडल्यानंतर सखोल तपास करून जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा होणे गरजेचे आहे.
गुन्हा सिद्धीचे
प्रमाण वाढले
जिल्ह्यातील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण दोन वर्षात वाढले आहे. २०२० मध्ये ३२ टक्के तर २०२१ मध्ये ३६ टक्के प्रमाण झाले आहे. त्रुटीविरहीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न झाल्यास यात आखणी वाढ होईल, असे बोलले जात आहे.
अपयशाचे खापर साक्षीदारांवर
सत्र न्यायालयात चालणाऱ्या भादंविच्या गुन्ह्यातील स्थिती गंभीर मानली जाते. मात्र अनेक प्रकरणात आरोपी हे निर्दोष सुटत आहेत. पंच, साक्षीदार, फिर्यादी फितूर होणे आदीमुळे आरोपी निर्दोष सुटत असल्याची कारणे सांगितली जात आहेत.
पोक्सोअंतर्गंत गुन्ह्यात होतेय वाढ
जिल्ह्यात पोक्सोअंतर्गंत गुन्ह्याचे प्रमाण कमी होते. मात्र मागील काही दिवसांपासून गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील चार महिन्यातच जिल्ह्यात चार ते पाच घटना घडल्या आहेत.