तहसीलदारांच्या बनावट डिजीटल स्वाक्षरीने वाटले उत्पन प्रमाणपत्र; तब्बल ५१ दिवसांनी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 06:54 PM2022-05-18T18:54:43+5:302022-05-18T18:55:19+5:30
उत्पन्न प्रमाणपत्रावर नाव एकाचे तर बारकोड दुसऱ्याचा वापरत कलर प्रिंट काढली
वसमत (हिंगोली) : निराधार वयस्कर व अशिक्षित व्यक्तीचा गैरफायदा घेत तहसीलदारांच्या डिजीटल स्वाक्षरीचे ५२ बनावट उत्पन्न प्रमाणपत्र तयार करत, तहसिल कार्यालयात निराधार योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव दाखल केल्या प्रकरणी ५१ दिवसांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
वसमत शहरासह ग्रामीण भागात दलाल मंडळी मोठ्या प्रमाणात अशिक्षित लोकांची फसवणूक करत फायदा उचलण्यात तरबेज झाले आहेत. श्रावण बाळ योजनेसाठी आलेल्या प्रस्तावांची २९ मार्च रोजी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी तपासणी केली. त्यांना ५२ निराधार योजनेच्या प्रस्तावात बनावट डिजीटल स्वाक्षरीचे उत्पन्न प्रमाण पत्र दिसून आले. प्रमाणपत्राचा बारकोड नंबर एक आहे. उत्पन्न प्रमाणपत्रावर नाव एकाचे तर बारकोड दुसऱ्याचा वापरत कलर प्रिंट काढुन निराधार योजनेचा फायदा घेण्यासाठी शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले होते.
याप्रकरणी तब्बल ५१ दिवसानंतर बनावट उत्पन प्रमाणपत्र प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अव्वल कारकुन शेख सतार आयुब यांनी १७ मे रोजी रात्री ९ वाजता फिर्याद दिल्यावरुन रमेश साळवे (रा. पंचशील नगर, वसमत) यांच्या विरुध्द कलम ४२०,४६५,४६८,४७१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, फौजदार बाबासाहेब खार्डे, कृष्णा चव्हाण, भगीरथ सवंडकर, महिपाळे करीत आहेत.