७ वर्षांपासून कुटुंब शस्त्रक्रिया बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:24 AM2021-01-14T04:24:58+5:302021-01-14T04:24:58+5:30
शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सात वर्षांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व गरोदर मातांची प्रसूती करणे बंद ...
शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सात वर्षांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व गरोदर मातांची प्रसूती करणे बंद असल्यामुळे अनेकांची गैरसाेय हाेत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ उपकेंद्र आहेत. या अंतर्गत ३८ गावांचा समावेश आहे. येथे २०१३ मध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते. त्यानंतर, इमारत मोडकळीस आल्याच्या कारणामुळे शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या. पुढे मार्च, २०१४ मध्ये नवीन इमारत बांधकामासाठी सुरुवात झाली. या इमारतीला जवळपास ४ कोटींचा निधी मिळाला असून, हे काम दोन वर्षांत पूर्ण करावयाचे होते, परंतु तब्बल चार वर्षे बांधकामासाठी लागले आहेत. या इमारतीचे २०१९ मध्ये उद्घाटन करण्यात आले. त्याला एक वर्षाचा कालावधी होऊनही आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे येथील कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व प्रसूती सुविधा बंद आहे. नवीन इमारतीसाठी काेट्यवधीचा निधी खर्च करून सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यात आले. यामध्ये अध्यापही विजेची व जनरेटरची सुविधा करण्यात आली नाही, तसेच आराेग्य तपासणीसाठी आवश्यक असणारे विविध साहित्य सामग्री व उपकरणे उपलब्ध नाहीत, तसेच येथील आरोग्यसेविका, शिपाई यांचे एक पद रिक्त आहे, तसेच या आरोग्य केंद्रातील ३८ गावांतील महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियासाठी व प्रसूतीसाठी औंढा, वसमत, हिंगोली, नांदेड या ठिकाणी जावे लागत आहे.
याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष करीत आहे, तसेच हिंगोली जिल्ह्या दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे. शासनाने सहा कोटी रुपये खर्च करून शिरडशहापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन सुसज्ज इमारती उभारली आहे. मात्र, सुविधा नसल्याने अनेकांची गैससाेय हाेत आहे. परिसरातील नागरिकांना व रुग्णांना येथे चांगली सुविधा मिळेल, अशी अपेक्षा होती, परंतु आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे व गलथान कारभारामुळे रुग्णांना उपचारासाठी शहरी भागाकडे धाव घ्यावी लागत आहे, तरी याकडे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. फाेटाे नं.०५