पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा बँकेतच संताप; विषारी किटकनाशकच प्यायले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 06:21 PM2023-09-20T18:21:31+5:302023-09-20T18:22:09+5:30
विषारी कीटकनाशक घेतले; पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले
हिंगोली: औंढा नागनाथ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत दोन वर्षांपासून पीक कर्ज मंजूर होत नसल्याच्या रागात एका शेतकऱ्याने विषारी औषध प्रशासन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे औंढा येथे एकच खळबळ उडाली. ही घटना २० सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेदरम्यान घडली. संबंधित शेतकऱ्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील जोडपिंपरी येथील रहिवासी भूजंग माणिकराव पोले (वय ३६) हे दत्तक असलेल्या महाराष्ट्र बँक शाखेत मागील दोन वर्षांपासून पीक कर्जाची मागणी करीत होते. पीक कर्ज मंजूर करावे, यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून मागील अनेक महिन्यांपासून बँकेचे खेट्या मारत होते. परंतु ‘सीबील’च्या नावाखाली बँकेकडून कर्ज मंजूर करण्यात येत नसल्याने शेवटी हवालदिल होऊन भूजंग पोले यांनी बुधवारी बँकेत मॅनेजरसमोरच सोबत आणलेले कीटकनाशक पिण्याचा प्रयत्न केला. यावेळी बँक कर्मचारी व इतरांनी तत्काळ धाव घेत कीटकनाशक औषधी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. सदर शेतकऱ्याने किती प्रमाणात औषध घेतले हे कळू शकले नाही. औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात संबंधित शेतकऱ्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.