पानकनेरगावात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 12:02 PM2023-03-07T12:02:56+5:302023-03-07T12:03:24+5:30
हिंगोली जिल्ह्यात विविध भागात ७ मार्च रोजी भल्या पहाटेपासून रिमझिम पाऊस पडत होता.
हिंगोली: जिल्ह्यात काल रात्रीपासून ढगाळ वातावरण असून ७ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
हिंगोली जिल्ह्यात विविध भागात ७ मार्च रोजी भल्या पहाटेपासून रिमझिम पाऊस पडत होता. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव, डोंगरकडा, जवळा पांचाळ, आखाडा बाळापूर, रामेश्वर तांडा परिसरात रिमझिम पाऊस पडला. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंबा संत्री मोसंबी व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. औंढा तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. हिंगोली तालुक्यातील विविध भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. हिंगोलीत सकाळी दहाच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली होती.
या सुमारास सेनगाव तालुक्यातील विविध भागातही पावसाने हजेरी लावली. गोरेगाव, पानकनेरगाव, आजेगाव, सेनगाव या भागात पावसाच्या सरी कोसळल्या. पानकनेरगावात पाऊस पडत असल्याने विलास शामराव गव्हाणे (वय ३५) हा शेतकरी शेतात जाऊन गव्हाची सुडी झाकण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी वीज कोसळून हा शेतकरी जागी ठार झाला. विलास यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.