हिंगोलीत अधांतरीच सुटले शेतकऱ्यांचे चुका-यांसाठीचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:02 AM2018-02-01T00:02:51+5:302018-02-01T00:07:42+5:30
तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण हातघाईवर आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण हातघाईवर आले होते.
२५ जानेवारीपासून उपोषण सुरू असतानाही प्रशासनाने दखलही घेतली नाही. शेवटी सातव्या दिवशी विलास मुटकुळे व केशव मुटकुळे या दोघांची प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केल्याची खबर आडगावात पोहोचली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. नातेवाईक व ग्रामस्थ चिंतेत सापडले होते.
दोघांना रूग्णालयात दाखल केले. प्रशासन उपोषणार्थींची दखल घेत नाहीत, म्हणून गावातील पांडुरंग सोनाजी मुटमुळे, सरपंच प्रशांत कंधारकर, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी दत्तराव मुटकुळे यांनी आपसात चर्चा करून उपोषणापासून शेतकºयांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांसह हे सर्वजण जिल्हा कचेरीसमोर उपोषणस्थळी बुधवारी दुपारी पोहोचले. पांडुरंग मुटकुळे यांनी चुकाºयाची रक्कम स्वत: देण्याची हमी दिली. सरपंच प्रशांत कंधारकर व दत्तराव मुटकुळे यांनी जवाबदारी स्वीकारली. शेवटी शब्दांचा मान राखत उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शविली. प्रशासन उपोषणाथीर्ची दखल घेत नसल्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन शेतक-यांचे उपोषण सोडविले.
मुख्यमंत्रीमित्र म्हणतो, सोयाबीनच परत करा !
सोयाबीनची नोंदणी केल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आलेल्या संदेशाप्रमाणे हिंगोली येथील हमीभाव केंद्रावर ९ नोव्हेंबर रोजी ३४ डाग सोयाबीनची विक्री केल्यानंतर अजूनही त्याची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार बाबाराव घुगे यांनी मार्केटिंग अधिकारी परभणी यांच्याकडे केली आहे. यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. २२ जानेवारी रोजी हमी केंद्र चालविणारे पवार व मॅनेवार यांनी तुम्ही नियमापेक्षा जास्त माल दिल्याने कुठेही जाऊ शकता, असे सांगून धुडकावून लावले. त्यामुळे आता माझे सोयाबीनच परत करा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. बाबाराव घुगे हे मुख्यमंत्रीमित्र असून इतरांची मदत करण्यास भाजपने ही सोय केली. मात्र त्यांनाच कोणी मदतीला धावत नाही.