शेतकरी हवालदिल! हळद बारा हजारांखाली तर सोयाबीन पाच हजारांचाही पल्ला गाठेना!

By रमेश वाबळे | Published: December 28, 2023 05:46 PM2023-12-28T17:46:49+5:302023-12-28T17:47:24+5:30

भाववाढीची प्रतीक्षा आणखी किती दिवस कारायची?...

Farmer in stress! Turmeric is under twelve thousand and soybeans are not even five thousand cost! | शेतकरी हवालदिल! हळद बारा हजारांखाली तर सोयाबीन पाच हजारांचाही पल्ला गाठेना!

शेतकरी हवालदिल! हळद बारा हजारांखाली तर सोयाबीन पाच हजारांचाही पल्ला गाठेना!

हिंगोली : एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट होत असताना दुसरीकडे हा माल कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या मार्केट यार्डात सध्या हळदीचे दर १२ हजारांखाली आले आहेत. तर सोयाबीनही पाच हजारांचा पल्ला गाठत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

येथील बाजार समितीचे संत नामदेव हळद मार्केट यार्डात मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. समाधानकारक भाव, मोजमापात विश्वासाहर्ता, रोख व्यवहार यामुळे शेतकऱ्यांचा ओढा या मार्केटकडे आहे. यंदा ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ४ ते ५ हजार क्विंटलची आवक होत होती. त्यावेळी सरासरी भावही जवळपास १५ हजार रुपये मिळत होता. परंतु, भावात आणखी वाढ होईल, या आशेमुळे काही शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली. परंतु, भाव वधारण्याऐवजी घसरले. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून भावात घसरण होत गेली. क्विंटलमागे दोनशे ते चारशे रुपयांच्या फरकात भाव आहेत.

मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार २३ ते २६ डिसेंबरदरम्यान सुटी, ख्रिसमसमुळे बंद ठेवण्यात आले होते. तर २७ डिसेंबर रोजी हळदीची बिट झाली. या दिवशी आवक वाढून २ हजार ८०० क्विंटलवर गेली. तर सरासरी ११ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. ऑगस्ट, सप्टेंबरच्या तुलनेत सध्या क्विंटलमागे तीन हजार रुपयांनी भाव कमी मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांची निराशा होत आहे.

यंदा सोयाबीनही पाच हजारांचा पल्ला गाठत नसल्याने उत्पादकांच्या पदरी निराशा आली आहे. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु, भाव काही वधारत नसल्याचे चित्र आहे. सध्या सरासरी ५०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. तर सरासरी ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. घटलेले उत्पादन आणि सध्या मिळत असलेला भाव लक्षात घेता लागवडही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

भाववाढीची प्रतीक्षा आणखी किती दिवस कारायची?...
शेतकऱ्यांकडे नवे सोयाबीन उपलब्ध होऊन जवळपास दीड ते दोन महिने झाले. परंतु, भाव पडत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे. परंतु, भाव काही पाच हजारांवर जात नसल्याने आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हळद उत्पादकांची परिस्थितीही वेगळी नसून, भाववाढीची प्रतीक्षा आहे.

मोंढ्यात हरभरा स्थिर...
येथील मोंढ्यात मागील पंधरवड्यापासून हरभऱ्याचे भाव स्थिर आहेत. गुरूवारी ८० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ४ हजार ९५० ते ५ हजार ४०० रूपये भाव मिळाला. तर सरासरी ५ हजार १७५ रूपये भाव राहिला. सध्या भाव स्थिर आहेत. परंतु, येणाऱ्या दिवसात भावात घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.

गहू, ज्वारी, तुरीची आवक मंदावली...
सध्या मोंढ्यात गहू, ज्वारी, तुरीची आवक मंदावली आहे. २८ डिसेंबर रोजी गहू आणि तूर प्रत्येकी ५ क्विंटल झाली होती. आवक मंदावल्याने गव्हाचे दर वधारले असून, सरासरी २ हजार ८०० रूपये क्विंटलने विक्री होत आहे. तर तुरीची आवक मंदावली तरी दरवाढ होत नसल्याचे चित्र आहे. ६ हजार ६०० रूपये क्विंटलने तुरीची विक्री झाली. ज्वारीची आवकही कमी होत असून, सरासरी ३ हजार रूपयांचा भाव मिळत आहे.

Web Title: Farmer in stress! Turmeric is under twelve thousand and soybeans are not even five thousand cost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.