वसमतच्या शेतकऱ्याला बीजोत्पादनाच्या प्रकल्पाने ना बाजाराची चिंता ना भावाची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:15 PM2018-12-03T12:15:26+5:302018-12-03T12:15:56+5:30

यशकथा : बीजोत्पादन शेतीमध्ये कोणतीच रिस्क नसल्याने ही शेती फायदेशीर ठरत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

The farmer of Vasmat should not be concerns of market place or cost due to seed production | वसमतच्या शेतकऱ्याला बीजोत्पादनाच्या प्रकल्पाने ना बाजाराची चिंता ना भावाची काळजी

वसमतच्या शेतकऱ्याला बीजोत्पादनाच्या प्रकल्पाने ना बाजाराची चिंता ना भावाची काळजी

googlenewsNext

- गंगाधर भोसले, (वसमत, जि. हिंगोली)

वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे येथील शेतकरी साहेबराव शिंदे यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन बीजोत्पादनाकडे वाटचाल केली आहे. शिंदे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून शेतीत कालसापेक्ष बदल करीत बीज उत्पादक कंपनीशी करार करून हमीभावाने बीज विक्री करीत आहेत. त्यामुळे बाजार शोधणे, भावातील घसरण याबद्दल कोणतीच काळजी न करता शेती करणे फायदेशीर ठरत असल्याचे ते सांगतात. 

साहेबराव शिंदे एक वेळेस कांदा बीज विक्रीसाठी जालना मार्केटमध्ये गेले असता तेथे त्यांचा बीज उत्पादक कंपनीशी संबंध आला. त्यांनी बीजोत्पादन विषयक करार करून करार पद्धतीनेच बीजोत्पादन शेतीला सुरुवात केली. करार पद्धतीने बीजोत्पादन शेती केल्याने कंपनीच्या माध्यमातून बीज अथवा रोप शेतामध्ये उपलब्ध करून दिले जातात. त्याबरोबरच लागणारे खत, कीटकनाशके वापरण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळते, उत्पादित झालेले बीज शेतातूनच कंपनी खरेदी करते. खरेदी करारानुसार हमीभावातच खरेदी होते. शिवाय नगदी व्यवहार केला जातो. यामुळे बऱ्याच अडचणी सुटतात आणि बीजोत्पादन शेतीमध्ये कोणतीच रिस्क नसल्याने ही शेती फायदेशीर ठरत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे आपल्या शेतात सीड्स प्लॉट खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात घेतात. यामध्ये कारला, भेंडी, दोडका, दुधी भोपळा, कांदा, मिरची यांचा समावेश असून प्रत्येक भाजीपाल्याच्या बीजोत्पादनासाठी जवळपास चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी लागतो त्यामुळे वर्षभरातून दोन टप्प्यांत सहजपणे बीजोत्पादन घेता येते. कांदा, भेंडी आणि दोडका या भाजीपाला बीजोत्पादनासाठी साधारणत: एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो आणि एकरी ५० ते ५५ हजारांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते.

या उत्पादनासाठी चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी लागतो. वर्षातून दोन वेळा सीड्स प्लांट घेऊन एकरी एका लाखापेक्षा जास्त उत्पन्न शिंदे काढतात. त्यांना आठ एकर शेती असून मधुकर व मोहन या दोन मुलांसह सुना असे एकत्र कुटुंब असल्याने सर्वजण शेतीकामास मदत करतात. त्यामुळे त्यांना बीजोत्पादन शेती करणे सहज शक्य होते.

मिरची सीड्स प्लॉटमधून सर्वात जास्त उत्पन्न मिळते परंतु त्यासाठी शेडनेटसह कुशल कामगारांची गरज असते. दहा गुंठ्यातील प्लॉटसाठी जवळपास ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो. या दहा गुंठ्यात रोप लागवडीपासून ४५ दिवसाला नर-मादी फुलांचे पोलण (संकर) कराण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यासाठी पंधरा कुशल कामगारांची आवश्यकता असते. दहा गुंठ्यात एक क्विंटल बिजोत्पादन होते.

हे बीज ३ लाख ५० हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कंपनी खरेदी करते. कंपनी हमीभाव देते, सर्व सुविधा कंपनीद्वारे शेतापर्यंत पोहोचविल्या जातात. मोफत मार्गदर्शनही मिळते. त्यामुळे पारंपारिक शेती आणि भाजीपाला उत्पन्नापेक्षाही बीजोत्पादन फायदेशीर ठरत असल्याचे साहेबराव शिंदे यांनी सांगितले.

Web Title: The farmer of Vasmat should not be concerns of market place or cost due to seed production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.