दुष्काळी अनुदानासाठी शेतकरी आक्रमक; मोबाईल टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी
By विजय पाटील | Published: May 27, 2024 02:03 PM2024-05-27T14:03:22+5:302024-05-27T14:03:56+5:30
शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. परंतु अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले नाही.
हिंगोली: गत वर्षभरापासून जिल्ह्यातील शेतकरी अनेक संकटांचा सामना करीत आहेत. कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत तर कधी कोरड्या दुष्काळाचा. मध्यंतरी शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. परंतु अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला असून रबी हंगामात पेरणी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा इशारा शासनाला दिला आहे.
गतवर्षीपासून शेतकरी या ना त्या कारणांमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान व अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या दारी चकरा माराव्या लागत आहेत. राज्य शासनाने हिंगोली जिल्हा दुष्काळसदृश्य असल्याचा शासन निर्णय घेतला. परंतु काही मोजक्या शेतकऱ्यांनाच शासनाने जाहीर केलेले अनुदान मिळाले आहे. बाकी गरीब शेतकरी आजही शासनाच्या अनुदानापासून वंचितच आहेत. शासनाने विजबिलमध्ये सवलत, सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन, शाळा शुल्कमध्ये सवलत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती व्यवस्थापनातून मदत जाहीर करण्यात आली. मात्र शासन निर्णय होऊन सुद्धा सहा महिने उलटून गेले आहेत. अजूनही शेतकऱ्यांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही.
या अनुषंगाने जिल्ह्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी २७ मे रोजी ‘आमच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करावे अन्यथा आम्ही मोबाईल टॉवरवर बसून राहू’ असा निर्णय घेतला. शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत इतके निष्ठूर का झाले? हे मात्र कळायला मार्ग नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तरच मोबाईल टॉवरवरुन खाली उतरु नसता टॉवरवर बसून राहू, असा एकमुखी निर्णय ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.
दिखावा म्हणून शेतकऱ्यांचा कळवळा दाखविला जातो....
गत वर्षभरापासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप, रबी व उन्हाळी हंगामातील एकाही शेतीमालाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे तर कोणते पीक घ्यावे हे शेतकऱ्यांना कळत नाही. पीक चांगले यावे म्हणून शेतकरी रात्रंदिवस शेतात राबराब राबत आहे. परंतु मोंढ्यात शेतीमाल नेला तर त्यातही अनेक त्रुट्या काढल्या जात आहेत. ‘शेतकरी जगला तर देश जगेल’ असे लोकांना दाखविण्यापुरते आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांचा ना लोकप्रतिनिधी, ना शासनाला कळवळा आहे.
पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे...
रबी हंगाम काही दिवसांवर येवून ठेपला आहे. शेतकऱ्यांच्याजवळ आज पैसा नाही. बी-बियाणे, खते, औषध कोठून आणावे ? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन केले तर तात्पुरते आश्वासन दिले जातात. त्यानंतर मात्र त्या आश्वासनाची कोणीही पूर्तता करत नाही. शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या तरच आम्ही मोबाईल टॉवरवरुन खाली उतरु, नसता दिवसरात्र येथेच बसून राहू, असा पवित्रा ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. आज पहिला दिवस आहे. अजून महिना लागला तरी दुष्काळी व अतिवृष्टीचे अनुदान सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत पडणार नाही. तोपर्यंत बसून राहणार असेही शेतकऱ्यांनी सांगितले.