विहिरीच्या थकीत बिलासाठी शेतकऱ्याचे भिकमागो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 03:23 PM2019-06-19T15:23:03+5:302019-06-19T15:24:55+5:30
‘भिक वाढा हो, भिक वाढा शेतकऱ्याला भिक वाढा’ अशी याचना करत गावंडे यांनी कार्यालयासमोर ठाण मांडले
हिंगोली : ‘भिक वाढा हो, भिक वाढा..शेतकऱ्याला भिक वाढा’ अशी याचना करत एका शेतकऱ्याने येथील पंचायत समितीसमोर भिकमागो आंदोलन केले. किशोर गावंडे असे आंदोलक शेतकऱ्याचे नाव असून मग्रारोहयो अंतर्गत काम पूर्ण केलेल्या विहिरीचे बिल गत दोन वर्षांपासून थकले आहे. पंचायत समितीकडे वारंवार पाठपूरावा करुनही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत गावंडे यांनी बुधवारी (दि.१९ ) दुपारी १ वाजेच्या दरम्यान हे आंदोलन केले.
हिंगोली तालुक्यातील वांझोळा येथील शेतकरी किशोर उत्तम गावंडे यांनी बुधवारी दुपारी १ वाजता हिंगोली पं.स. कार्यालयासमोर भिकमागो आंदोलन केले. मग्रारोहयोच्या विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने विहिरींची कामे पूर्ण करुन घेतली. शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी जीएसटीसह बिले पं.स.ला सादर केली. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे निधी शेतकऱ्यांना मिळाला नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत. सध्या खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली असून खत, बियाणे खरेदीसाठी जवळ खडकुही नाही. हक्काचे पैसे असूनही मिळत नसल्याने प्रशासनाने शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणली आहे अशी व्यथा गावंडे यांनी मांडली.
‘भिक वाढा हो, भिक वाढा शेतकऱ्याला भिक वाढा’ अशी याचना करत गावंडे यांनी कार्यालयासमोर ठाण मांडल्याने परिसरात मोठी गर्दी जमली होती. जवळपास दोन तास आंदोलन करुनही दालनात बसलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठी दालनातून बाहेर येण्याचीही तसदी घेतली नाही. या प्रकारामुळे जमलेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. गटविकास अधिकाऱ्याकडून न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याने दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत मग्रारोहयोच्या विहिरीची बिले मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे गांवडे यांनी सांगितले.