अतिवृष्टीची मदत, सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी चढले मोबाईल टॉवरवर
By यशवंत भीमराव परांडकर | Published: September 5, 2024 08:05 PM2024-09-05T20:05:25+5:302024-09-05T20:05:37+5:30
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची प्रचंड नासाडी झाल्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे.
- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि. हिंगोली): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत द्या व सरसकट कर्जमाफी करा या मागणीसाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी गोरेगाव येथील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविल्या जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते टॉवरवरुन खाली उतरले.
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची प्रचंड नासाडी झाल्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीची मदत देत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी ५ सप्टेंबर रोजी गोरेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबरदरम्यान संततधार पाऊस झाल्यामुळे जिल्हाभरात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसामुळे झालेली पिकहानी बघता नापिकीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज असतानाही सरकार व प्रशासन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यासारख्या घोषणा करीत असल्याचा आरोप शेतकरी नेते गजानन कावरखे, नामदेव पतंगे, सखाराम भाकरे, बालाजी मोरे, सतीश इढोळे, अमोल भाकरे आदींनी केला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे व पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मागण्यांचे लेखी निवेदन दिले आणि आंदोलन मागे घेतले.
मुंबईत करणार अर्धनग्न आंदोलन ...
सरसकट कर्जमाफी व अतिवृष्टी अनुदान मदतीच्या मागणीसाठी बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. पुढील चार दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडून दखल घेतली गेली नाही तर तुपकर यांच्या आंदोलनाच्या समर्थनात मुंबई येथे अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.