मशागतीचे काम करत असलेल्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 06:39 PM2019-05-27T18:39:12+5:302019-05-27T18:39:37+5:30
मशागत करताना शेताच्या आजूबाजूला कोणी नव्हते
शिरडशहापूर (जि.हिंगोली): शेतात मशागतीचे काम करीत असताना एका शेतकऱ्याचा उष्माघातानेमृत्यू झाल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे रविवारी (दि.२६) घडली.
शिरडशहापूर येथील शेतकरी गंगाधर दामाजी आकमार (५२) हे आपल्या शेतात बैलजोडीद्वारे शेती मशागतीचे काम करीत होते. दुपारी अंदाजे ४ वाजता त्यांनी बैलजोडी लावून शेतात वखर लावला होता; परंतु त्यांना अचानक चक्कर आली व शेतातच बेशुद्ध पडले. ते शेतात एकटेच होते. संध्याकाळी घरी न आल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी शेतात वखरास जुंपलेल्या बैलजोडी जवळ ते बेशुद्धावस्थेत पडलेले होते.
नातेवाईकांनी त्यांना उठविण्याच्या प्रयत्न केला मात्र ते शुद्धीवर आले नाहीत. यावेळी रक्ताच्या उलटीमुळे त्यांचे कपडे रक्ताने भरलेले होते. यामुळे त्यांचा मृत्यूउष्माघातानेच झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतात आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून एका पाठोपाठ पाच ते सहा जण उष्माघाताने मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.