शेतकऱ्यांचा टाहो ! पूर्णा प्रकल्पाचे पाणी कोणी तरी वाचवा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 06:50 PM2020-02-11T18:50:12+5:302020-02-11T18:52:04+5:30

 वाया जाणाऱ्या पाण्याने उलट नुकसानीच्या झळा

Farmers' helpless! Whoever saved the water from the Purna project ... | शेतकऱ्यांचा टाहो ! पूर्णा प्रकल्पाचे पाणी कोणी तरी वाचवा हो...

शेतकऱ्यांचा टाहो ! पूर्णा प्रकल्पाचे पाणी कोणी तरी वाचवा हो...

googlenewsNext
ठळक मुद्देदरवाजांना पैसे देण्याची शेतकऱ्यांची तयारीसहा महिन्यांतच दोन्ही धरणे रिकामी होण्यास वेळ लागणार नाही. 

- चंद्रकांत देवणे 

वसमत : पूर्णा प्रकल्पाच्या दुसऱ्या पाणीपाळीतही प्रचंड प्रमाणात पाणी वाया जात आहे. मायनरला दरवाजे न बसवताच पाणीपाळ्या देवून अधिकारी, कर्मचारी नांदेडला खुशाल राहत असल्याने पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. पाच वर्षांत पाणी पाणी करत प्रचंड होरपळल्यानंतर आता असे पाणी वाया जात असल्याचे पाहून कोणी तरी पाणी वाचवा हो, असा आक्रोश शेतकरी करत आहेत. 

पूर्णा पाटबंधारेच्या पाण्यावर वसमतसह नांदेड, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तहानभूक अवलंबून आहे. तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा धरण भरल्याने आता किमान तीन वर्षे तरी पाणी कमी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त होत होता.मात्र आता तर विचित्र चित्र समोर येत आहे. गेल्या पाच- सात वर्षांत कालवे-चाऱ्यांतून पाणी वाहिले नसल्याने चाऱ्या, मायनर गाळ व काटेरी झुडपे, गवताने भरून गेल्या आहेत. काही मायनर जमीनदोस्त झाले आहेत. आता पाणी पाळी देण्यापूर्वी ही सर्व मायनर, वितरिका, चाऱ्यांची दुरूस्ती करूनच पाणी सोडणे अपेक्षित होते. मात्र पूर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन व बेपर्वा वृत्तीमुळे कागदावरच मायनर साफ झाली. पाणीपाळी दिल्यानंतर नियोजनानुसार प्रत्येक मायनरवरून वितरिकेद्वारे शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याची जवाबदारी असते. मात्र यावेळी पाणी नियोजन काय असते? हेच माहिती नसल्यासारखी अवस्था आहे. सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडले ते वाट फुटेल तसे वाहत आहे. मायनरला दरवाजेच नाहीत. त्यामुळे मुख्य कालव्यांवर असलेल्या मायनरमधून थेट चाऱ्यांमध्ये व चाऱ्या गाळांनी भरलेल्या असल्याने थेट रस्त्यावर पाणी असे चित्र आहे. 

१५ ते २० दिवसांची पाणीपाळी देण्यात येत आहे. हे २० दिवसही पाणी नको असेल तरी शेतापर्यंत पोहोचत आहे. चाऱ्या फोडून रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. बीबीसी कालव्यावर असलेल्या जवळा मायनरला दरवाजे भसल्याने पहिल्या पाळीमधील पाण्याची प्रचंड नासाडी झाली.आता तिसऱ्यांदा पाणी आले तरीही दरवाजे नसल्याने पाणी अखंडपणे वाया जाणे सुरूच आहे. पाणी मागणी अर्ज नाहीत, शेतकऱ्यांकडून मागणी नाही. सध्या पाण्याची आवश्यकता नाही तरीसुद्धा पाणीपाळी देण्यामागचा हेतूच समजत नाही. 

आजपर्यंत पाण्याअभावी होरपळल्या गेले व आता पाणी वाया जात असल्याचे पाहून शेतकरी आचंबित आहेत. कोणी तरी पाणी वाचवा हो, असा धावा करत आहेत. मात्र पूर्णा प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी व अभियंते नांदेडहून कारभार पाहत असल्याने वाया जाणारे पाणी पाहत हळहळ व्यक्त करण्याशिवाय पर्याय नाही. कागदावर कालवे स्वच्छ करण्यात कोणाला किती लाभ झाला, शासनाच्या तिजोरीला किती चुना लागला याचा हिशोब चौकशी झाल्यावर लागेल मात्र वाया गेलेले पाणी पुन्हा परत येणार नाही. त्यामुळे दरवाजे बसवा मगच पाणी सोडा, अशी मागणी होत आहे. असेच पाणी वाया जात राहीले तर सहा महिन्यांतच दोन्ही धरणे रिकामी होण्यास वेळ लागणार नाही. 

दरवाजांना पैसे देण्याची शेतकऱ्यांची तयारी
मायनरला दरवाजे बसविण्यासाठी पूर्णा प्रकल्पाकडे पैसे नसतील तर जवळा मायनरला दरवाजा बसवण्यासाठी स्वत: खर्च करण्याची तयारी शेतकरी सुभाष भोपाळे यांनी दर्शविली. दरवाजा बसवा खर्च देतो, असा निरोप शाखा अभियंत्यांनाही दिला. तरीही तिसऱ्या पाळीला दरवाजा न बसवताच पाणी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ४शाखा अभियंता पठाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की , मायनरला दरवाजे नाहीत, हे सत्य आहे. दरवाजे नसल्याने पाणी वाया जात आहे, हेसुद्धा खरे आहे. मात्र मागणी करूनही दरवाजे बसवलेले नाहीत. त्यामुळे अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी वाया जात आहे हे मान्य करणारे दरवाजे न बसवता पाणी का सोडत आहेत, हे कोडे आहे. 

Web Title: Farmers' helpless! Whoever saved the water from the Purna project ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.