दर्जाहीन रोपांमुळे शेतकरी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:11 PM2018-12-04T23:11:44+5:302018-12-04T23:11:59+5:30
परिसरातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानांतर्गत फळबाग लागवडीच्या कामांना सुरूवात झाली आहे. मात्र निर्माण झालेला पाणीप्रश्न आणि त्यातच शासनमान्य रोपवाटिकेद्वारे दर्जाहीन रोपाचा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. लागवडीपूर्वीच रोपे सुकून करपत असल्याने या योजनेचा फज्जा उडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : परिसरातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानांतर्गत फळबाग लागवडीच्या कामांना सुरूवात झाली आहे. मात्र निर्माण झालेला पाणीप्रश्न आणि त्यातच शासनमान्य रोपवाटिकेद्वारे दर्जाहीन रोपाचा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. लागवडीपूर्वीच रोपे सुकून करपत असल्याने या योजनेचा फज्जा उडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
गोरेगावसह परिसरातील निवड झालेल्या गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानास सुरूवात झाली आहे. कृषी सहाय्यक जी.बी. काळे, कृषी पथकाच्या वतीने केलेल्या जनजागृृती, सूक्ष्मनियोजन प्रकियेनंतर विविध कृषी विकास कामे प्रस्तावित करून ग्रामपंचायतकडून आराखड्यास मंजुरी दिली होती. यात प्रस्ताव सादर करीत ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दर्शविला होता.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरअखेर फळबाग लागवडीस सुरूवात झाली असून जमिनीतील पाणीपातळी खालावल्यामुळे विहिरी, बोअरवेल डबघाईस आल्याने शेती सिंचनाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे लाभधारक शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाच्या परमिटवर शासनमान्य रोपवाटिकेतून दर्जाहीन रोपांचा पुरवठा होत असल्याची शेतकºयांची ओरड आहे. दर्जेदार रोपे उपलब्ध नसल्याने फळबाग योजनेला खोडा बसल्याचे अनुभवयास मिळत आहे. वसमत तालुक्यातील रिधोरा येथील श्रीकृष्णा रोपवाटिकेतून रोपे दिली जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. वाढ खुंटलेली रोपे असून त्यांच्या जातीविषयी कुठलीच हमी दिली जात नसल्याने शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी गत होत आहे.
याबाबत कृषी सहाय्यक जी.बी. काळे यांना विचारल्यावर ते म्हणाले, परभणी कृषी विद्यापीठात रोपांचा तुटवडा असून शासनमान्य नर्सरीतून रोपपुरवठा होत आहे. त्यात फसवणूक झाल्यास शेतकºयांनी रीतसर तक्रार करावी.