शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:40+5:302021-06-09T04:37:40+5:30

हिंगोली: सद्य: स्थितीत पडत असलेला पाऊस हा मान्सूनपूर्व आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीसाठी घाई, गडबड करु नये, असे ...

Farmers should not rush for sowing! | शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये !

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये !

Next

हिंगोली: सद्य: स्थितीत पडत असलेला पाऊस हा मान्सूनपूर्व आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीसाठी घाई, गडबड करु नये, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

गत पंधरा-वीस दिवसांपासून सर्वत्र पाऊस पडत आहे. परंतु, हा पडत असलेला पाऊस पेरणीयोग्य नाही, हेही तितकेच महत्वाचे आहे. पेरणीसाठी कमीत कमी ७५ ते १०० मिमी मौसमी पावसाची आवश्यकता असते. अजून तरी जमिनीतील धूपही कमी झालेली नाही. मान्सूनपूर्व पडलेल्या पावसावर पेरणी केली तर, बियाणे वाया जाण्याची शक्यता असते. मान्सूनपूर्व पाऊस केव्हाही खंड देवू शकतो. तेव्हा महागामोलाचे बियाणे वाया जावू द्यायचे नसेल तर सद्य:स्थितीत पडत असलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करु नये.

गतवर्षी ४० ते ४५ टक्के शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसावर पेरणी केली. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांचे बियाणे वाया गेले आहे. तर अनेकांनी पेरलेली बियाणे उगवली नाहीत. परिणामी त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. तसेच अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली हाेती. यामुळे गतवर्षीची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी यावेळी पेरणीसाठी घाई करु नये, असेही आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे.

‘वनामकृ’ विद्यापीठाचा सल्ला घ्यावा

खरीप, रबी अथवा कोणत्यावेळी काही शेतीविषयक इतर काही अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे आपल्या अडचणी सांगाव्यात. विद्यापीठातील तज्ज्ञ मंडळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधत मार्गदर्शन करतात. मान्सूनपूर्व पाऊस हा कधीही पेरलेल्या बियाणांसाठी धोकादायकच आहे. पेरणी योग्य पाऊस पडेपर्यत शेतकऱ्यांनी बियाणे, खते व इतर शेती विषयक औजारांची जुळवाजुळव करुन घ्यावी.

- डॉ. कैलास डाखोरे, मुख्य समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग

Web Title: Farmers should not rush for sowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.