शेतकरी पुत्राची कमाल, भंगारमधून बनवलेली ऑटोचार्ज ई-बाइक धावली सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 19:19 IST2025-01-08T19:18:38+5:302025-01-08T19:19:28+5:30

शेतकरी पुत्र मारोती विक्रम कुरुडे याचे सर्वत्र कौतुक होत असून बाईक पाहण्यासाठी गावात गर्दी होत आहे. 

Farmer's son's amazing work, auto-charging e-bike made from scrap ran smoothly | शेतकरी पुत्राची कमाल, भंगारमधून बनवलेली ऑटोचार्ज ई-बाइक धावली सुसाट

शेतकरी पुत्राची कमाल, भंगारमधून बनवलेली ऑटोचार्ज ई-बाइक धावली सुसाट

- इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली):
डोणवाड्याच्या १७ वर्षीय शेतकरी पुत्राने भंगारमधून अॅटोचार्ज ई-बाइक तयार करून कमाल केली आहे. ४५ किमी वेगाने धावणाऱ्या या ई-बाइकचे फायदे पाहून शेतकरी पुत्र मारोती विक्रम कुरुडे याचे सर्वत्र कौतुक होत असून बाईक पाहण्यासाठी गावात गर्दी होत आहे. 

वसमत तालुक्यातील डोणवाडा येथील मारोती विक्रम कुरुडे (१७, इयत्ता ११ वी) हा कळमनुरी येथील शिवराम मोघे सैनिक शाळेत शिक्षण घेत आहे. त्याच्या वडिलाचे निधन झाले असून आई चंद्रकला कुरुडे या उदरनिर्वाहसाठी शेती करतात. मारोतीस बालपणापासून विविध प्रयोग करण्याचा छंद आहे. काही दिवसांपूर्वी भंगारमध्ये टाकलेली मोपेड निदर्शनास आल्यानंतर मारोतीने त्यापासून ई- बाइक बनविण्याचा चंग बांधला. भंगारातील काही साहित्य अन् दुचाकीचे टायर वापरुन मारोतीने शेत आखाड्यावरील घरीच सहा ते सात दिवसात ‘ई-बाईक’ तयार केली. यापूर्वी त्याने रोबोट तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु आर्थिक अडचण आल्याने रोबोट पूर्ण करता आला नाही. दरम्यान, ई- बाईक तयार करण्यासाठी मारोतीस भाऊजीने आर्थिक मदत केली.

दमदार ई-बाइकचे सर्वत्र कौतुक
ई-बाइकमध्ये मारोतीने १२ वॉल्टच्या चार बॅटऱ्या वापरल्या आहेत. विशेष म्हणजे, ही ई-बाईक अॅटो चार्ज होते. चार पैकी दोन बॅटरी बाइक चालवत असताना चार्ज होत राहतात. यामुळे चार्जसाठी बाइक लावून ठेवण्याचा त्रास नाही. एकदा चार्ज झाल्यास बाइक जवळपास ६० किलोमीटरपर्यंत धावते. एवढेच काय बाईकवर दोन क्विंटलपर्यंत वजन घेऊन जाता येते. तसेच बाईकवर तीन जण बसून प्रवास करु शकतात. डोणवाडा गावात सहायक गटविकास अधिकारी सुनील अंभोरे भेटीसाठी आले असता त्यांनी ई-बाईक पाहून मारोतीचे कौतुक केले. यावेळी उपसरपंच रमेश दळवी, ग्रामसेवक दुर्गादास डुकरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

आता अधिक अंतर जाणारी ई-बाईक बनवणार...
आई, भाऊजी, मित्र नातेवाईकांचे प्रोत्साहन मिळाल्यानेभंगारातील जुन्या दुचाकीचे टायर, लोखंड, चार बॅटऱ्यांचा वापर करत ही ई-बाइक तयार केली. चार पैकी दोन बॅटरीवर बाईक चालते तर याचवेळी दुसऱ्या दोन बॅटरी अॅटोचार्जिंगसाठी वापरल्या जातात. सध्या ४५ किमी वेगाने बाइक जवळपास ६० किमी जाते. यापेक्षाही जास्त अंतर गाठणारी ई बाइक तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 
- मारोती विक्रम कुरुडे

Web Title: Farmer's son's amazing work, auto-charging e-bike made from scrap ran smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.