पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:16 PM2019-11-02T13:16:42+5:302019-11-02T13:17:38+5:30
शेतकऱ्यावर रूग्णालयात उपचार सुरू
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातही शासनाने अद्यापही नुकसानीचे पंचनामे न केल्यामुळे अन् शासनानेही पंचनामा केला नाही. त्यामुळे प्रकाश इंगोले या तरूण शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना औंढा नागनाथ तालुक्यातील उंडेगाव येथे १ नोव्हेंबर रोजी घडली. सदर शेतकऱ्यावर औंढा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेतकरी प्रकाश इंगोले यांना तीन एकर शेत आहे. परंतु परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे नुकसान झाले. इंगोले हे शुक्रवारी सकाळी ६ वाजता शेतातील सोयाबीनची पाहणी करून हताशपणे घरी परतले. घरी आल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांनी विषारी द्रव प्राशन केला. काही वेळाने त्यांच्या आईच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांच्यासह मनोज मुळे, संघरत्न इंगोले, अनिल वाघमारे, ऋषिकेश इंगोले, भारत दामोदरे, लक्ष्मी रणवीर आदींनी धाव घेऊन इंगोले यांना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकाश इंगोले यांना पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे. त्यांच्या परिवाराचे शेती हे एकमेव उपजीविकेचे साधन आहे. परंतु परतीच्या पावसामुळे जोमात असलेले सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाल्याने प्रकाश इंगोले यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नागरिकांनी सांगितले.
पंचनाम्याचे आदेश
औंढा नागनाथ तालुक्यातील शेतीचे परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, कृषी सेवक यांना दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत, अशी माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.