बोगस बियाणे, खताचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By विजय पाटील | Published: July 26, 2023 04:43 PM2023-07-26T16:43:41+5:302023-07-26T16:44:23+5:30
बोगस कीटकनाशक औषधी व खत बियाणे विक्रीच्या कारवाईसाठी दिला होता इशारा
गोरेगाव (जि. हिंगोली) : बोगस खते, बियाणांसह जैविक तथा रासायनिक कीटकनाशके व तणनाशकांच्या विक्रीवर आंदोलने करूनही कारवाई होत नाही. असा आरोप करीत शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी २६ जुलै रोजी दुपारी दीड वाजेदरम्यान विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.
बाजारपेठेत विक्री केल्या जात असलेल्या बोगस खत, बियाणांसह जैविक तथा रासायनिक कीटकनाशक व तणनाशकावर कारवाई करुन तपासणीमध्ये बोगस आढलेल्या उत्पादनाची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांच्याकडून १७ जुलै रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. बोगस व कालबाह्य कीटक व तणनाशक औषधाच्या विक्रीतून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सदर बाबीकडे कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची बाब नमूद करीत तसेच बोगस औषधा विक्री करणाऱ्या कंपन्यांवर व कृषी केंद्रांवर कारवाई का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर कारवाई न झाल्यास २६ जुलै रोजी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.
आत्मदहनाचा इशारा देऊनही याबाबत कृषी विभागाकडून कुठलीच दखल घेण्यात आली. त्यामुळे २६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास अमोल खिल्लारी यांच्याकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायलर करीत एका तासात मागणीची दखल न घेतल्यास दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कुठेही आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देत दुपारी दीड वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर तात्काळ खिल्लारी यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर हिंगोली येथे हलविण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले.
कारवाईच्या टाळाटाळीमुळे भडका...
बाजारपेठेत विक्री होणाऱ्या बोगस खत, बियाणांसह जैविक तथा रासायनिक तणनाशक व कीटक नाशकांवर कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघर्ष संघटना यांच्याकडून आंदोलने केली जात आहेत. मात्र सदर बाबीची गांभीर्यपूर्वक दखल न घेता कृषी विभागाकडून केवळ औषध नमुने तपासणीसाठी पत्रके काढीत वेळकाढू धोरण अवलंबले जात आहे. जिल्हा कृषी विभागाचा सदर दप्तर दिरंगाई कारभार बघता स्वाभिमानचे नामदेव पतंगे हे मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा देत मुंबईत दाखल झाले आहेत.