हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:33 PM2020-01-30T18:33:22+5:302020-01-30T18:34:28+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एनटीसी भागातील कार्यालयात घुसून टेबल व खुर्च्यांची तोडफोड केली.

Farmers vandalize office of crop insurance company in Hingoli | हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड

हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड

Next

हिंगोली : येथे बजाज अलायंझ कंपनीने शेतकऱ्यांकडून पीकविमा भरून घेतल्यानंतर शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. तसेच तक्रारींचीही दखल घेण्यास कार्यालय तयार नसल्याचा आरोप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कंपनीच्या एनटीसी भागातील कार्यालयात घुसून टेबल व खुर्च्यांची तोडफोड केली.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप २0१९ ला मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. त्यातच ऐन काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना अवकाळी पावसाला सामोरे जावे लागला. यात सर्व्हेक्षण करण्यावरून प्रशासन व कंपनीत बराच वाद होता. त्यातही प्रत्यक्ष अर्ज करायचा की नाही करायचा, हेही वाद होता. यात अनेक शेतकऱ्यांची नावेच पीकविमा यादीत नाहीत. त्यामुळे या विविध प्रकारच्या तक्रारी घेवून शेतकरी या कंपनीच्या कार्यालयावर जात आहेत. मात्र त्यांना उडवा-उडवीची उत्तरे मिळत होती. यात वैतागलेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आज दुपारी बाराच्या सुमारास हे कार्यालय गाठले. मात्र तेथे कोणीच आले नव्हते. भ्रमणध्वनीवरून उडवा-उडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला. आतमध्ये एक-दोन फायबर टेबल होते. त्याची तोडफोड केली. आतमध्ये दारुच्या रिकाम्या बाटल्या व सिगारेटची पाकिटे दाखवत कंपनीने कार्यालय नव्हे, तर हा दारुचा अड्डा बनवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. 

यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून पीकविमा भरून घेतला जात आहे. मात्र एकदाही विमा मिळाला नाही. यंदाही एवढे नुकसान होवूनही अद्याप छदाम मिळाला नाही. याकडे सरकारचेही लक्ष नसून कंपनीसोबत सरकारही या लुटीत सहभागी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी रावसाहेब बापूराव अडकीणे, नामदेव पतंगे, प्रकाश अडकिणे, सुभाष घाटगे, बापूराव गरड, डिगांबर गावंडे, नारायण कदम, किसन कदम, विशाल रोडगे आदी उपस्थित होते. या शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यातही यापूर्वीच निवेदन दिलेले होते. कार्यालयात कुणीच नसल्याने त्यांनी तोडफोड केली. ही घटना कळाल्यानंतर पोनि सय्यद हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र विमा कंपनीचे तक्रार करण्यास कुणीही आले नव्हते.

Web Title: Farmers vandalize office of crop insurance company in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.