श्रावणातला उपवास महागला; शेंगदाणे, भगर किलोमागे पाच रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:35 AM2021-08-25T04:35:05+5:302021-08-25T04:35:05+5:30
हिंगोली : श्रावणमासाला सुरुवात झाली आहे. भक्ती, उपासनेच्या या मासात भाविकांकडून साबूदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूर, आदींना मोठी ...
हिंगोली : श्रावणमासाला सुरुवात झाली आहे. भक्ती, उपासनेच्या या मासात भाविकांकडून साबूदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूर, आदींना मोठी मागणी असते. सध्या शेंगदाणा व भगरचे दर ५ ते १० रुपयांनी महागले आहेत.
कोरोनामुळे बाजारात फारशी गर्दी नसली तरी इंधन दरामुळे महागाई वाढली आहे. वाहतूक खर्चाच्या नावाखाली वस्तूंचे दर वाढतच जात आहेत. आषाढीनंतर श्रावणात उपवासाच्या पदार्थांना मागणी असते. आता ऐन श्रावणात शेंगदाणा, भगर या खाद्य वस्तूंच्या किमती वाढलेल्या दिसून येत आहेत. भाविकांना आता मागील महिन्यापेक्षा ५ ते १० रुपये जास्त मोजावे लागत आहेत. यामुळे भाविकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
आवक घटली, मागणी वाढली
भगर
- जिल्ह्यात भगरीचे उत्पादन फारसे होत नाही. त्यामुळे भगर आयात करावी लागते. ग्रामीण भागात भगरीला मागणी असते.
- मात्र, त्या तुलनेत उपलब्ध नसल्याने भगरीचे दर ५ रुपयांनी महागले आहेत. सध्या बजारात भगर ११५ रुपये प्रती किलो मिळत आहे.
शेंगदाणा
- उपवासाला साबूदाणासह शेंगदाणाही खरेदी केला जातो.
- उपवासाला शेंगदाण्याचे विविध पदार्थ केले जातात. त्यामुळे शेंगदाण्याचे दर ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत.
- सध्या शेंगदाणा १०० ते ११० रुपयांपर्यंत मिळत आहे.
साबूदाणाचे दर स्थिर
श्रावणमासात उपवास धरणारे भाविक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे साबूदाण्याला मागणी आहे. मात्र, सध्या बाजारपेठेत साबूदाणा मुबलक उपलब्ध आहे. त्यामुळे साबूदाण्याचे दर स्थिर आहेत. सध्या साबूदाणा ६० ते ७० रुपये प्रती किलो मिळत आहे.
मागणी दुप्पट वाढली
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. साबूदाणा, भगर, शेंगदाण्याला मोठी मागणी असली तरी त्या तुलनेत माल उपलब्ध होत नसल्याने या वस्तूंच्या दरात किंचित वाढ झाली आहे.
- मधुर झंवर, व्यापारी