गावकारभाऱ्यांच्या भाग्याचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:13+5:302021-01-18T04:27:13+5:30
कळमनुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.१७ टक्के मतदान झाले. येथील तहसील कार्यालयात १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २५ टेबलवर ...
कळमनुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.१७ टक्के मतदान झाले. येथील तहसील कार्यालयात १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २५ टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तहसील कार्यालयात गर्दी होऊ नये अथवा हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी तहसील गेटच्या समोर बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत. प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केलेली आहे. १७ जानेवारी रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उमेदवार व त्यांचे समर्थक मतमोजणीसाठी लागणारे ओळखपत्र घेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करीत होते. २५ टेबलद्वारे ११ फेऱ्यांतून मतमोजणी होणार आहे. तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असल्याने हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. १०० मीटरच्या जवळपास पोलीस कर्मचारी मतमोजणीच्या बंदोबस्तात राहणार आहेत. उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधीला आत प्रवेशाची मुभा राहणार आहे.
तालुक्यात २७५ मतदान केंद्रे असून पहिल्या फेरीत २५ मतदान केंद्रांची व त्यानंतर उर्वरित मतदान केंद्रांवरील मतदानाची मतमोजणी होणार आहे. १३६० उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. त्यांचा आज निर्णय हाेणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी दिली.