रिकामटेकड्यांवरील कारवाई बंद झाल्याने फावले; पूर्वी २५० जण आढळले पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:28 AM2021-05-22T04:28:16+5:302021-05-22T04:28:16+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी संचारबंदीतही फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. त्याला आवर ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी संचारबंदीतही फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. त्याला आवर घालण्यासोबतच कोरोनाबाधितांनी सार्वजनिक ठिकाणी फिरून या आजाराचा प्रसार करू नये, यासाठी पोलीस, न.प. व आरोग्य विभागाच्या पथकाने हिंगोली शहरातील विविध चौकांमध्ये फिरते तपासणी केंद्र लावले होते. याद्वारे केलेल्या तपासणीतही अनेक जण बाधित असल्याचे समोर येत होते. याशिवाय काही तालुक्यांच्या ठिकाणी व ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्येही अशा पद्धतीने तपासणी करण्यात आली होती. तीन ते चार हजार जणांची अशी तपासणी केल्यानंतर जवळपास ३५० रुग्ण आढळले होते. एकट्या हिंगोलीतच अडीचशे रुग्ण आढळून आल्याने कोरोना स्प्रेडरवर नियंत्रण आणता आले. आता अशा पद्धतीने तपासणीच होत नसल्याचे दिसते.
तीच ती कारणे
आताही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. तीच ती कारणे सांगितली जात आहेत. रुग्णालय, जीवनावश्यक वस्तू, अंत्यसंस्काराला जायचे आहे, अशी कारणे सांगितली जात आहेत. काही जण नुसतेच ओळखपत्र गळ्यात घालून शासकीय कार्यालयात जात असल्याचे सांगतानाही दिसत होते.
शहरात एकच तपासणी केंद्र
हिंगोलीत आता एकच तपासणी केंद्र उरले आहे. तेही दुपारी तीन वाजता बंद होते. पूर्वी जिल्हा रुग्णालयातही एक केंद्र होते. गर्दी ओसरण्यापूर्वीच ते बंद झाले. आता साठे वाचनालयातील केंद्रावरच सगळी भिस्त आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण १५१२२
बरे झालेले रुग्ण १४२७३
दुसऱ्या लाटेत किती रिकामटेकड्यांची कोरोना चाचणी करण्यात आली २७००
पॉझिटिव्ह किती २५०