१५ वर्षे वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर आजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:34 AM2021-08-21T04:34:18+5:302021-08-21T04:34:18+5:30

हिंगोली : सध्या पावसाचे दिवस असून साथीचे आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते. तेव्हा पालकांनी आपल्या लेकरांची काळजी घेणे गरजेचे ...

Fever at the age of 15, Acne can be measles! | १५ वर्षे वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर आजार !

१५ वर्षे वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर आजार !

googlenewsNext

हिंगोली : सध्या पावसाचे दिवस असून साथीचे आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते. तेव्हा पालकांनी आपल्या लेकरांची काळजी घेणे गरजेचे आहे. एक ते पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांना ताप येणे आणि अंगावर पुरळ आल्यास तो गोवर आजार असू शकतो. तेव्हा वेळीच याबाबत डॉक्टरांना दाखवावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

बहुतांश वेळा अंगावर पुरळ आल्यास अनेक पालक खासगी इलाज करतात. परंतु, असे न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन आशाताई व आरोग्य सेविकांना दाखवावे. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे ही गोवर संशयिताची असू शकतात. तेव्हा वेळीच पालकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून लेकरांची काळजी घ्यावी.

असे केले जाते निदान...

गोवर संशयित रुग्णांच्या रक्तजलाचे नमुने पुणे येथे पाठवून दिले जातात. यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार केला जातो. पालकांनी घाबरण्याचे काही कारण नाही. कारण औषधोपचार वेळेवर घेतल्यास गोवर आजार लवकर बरा होण्यास मदत होते. यासाठी व्हिटॅमिन ‘ए’ व पॅरासिटामाॅल औषध मुलांना दिले जाते.

१०० टक्के गोवर, रुबेलाचे लसीकरण...

जिल्ह्यात गोवर, रुबेलाचे लसीकरण हे १०० टक्के झाले आहे. गोवर, रुबेला आजारासंदर्भात वेळोवेळी आरोग्य कर्मचारी, आशाताई, आरोग्यसेविकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात. या दरम्यान संशयित गोवर रुग्णांची काळजीही घेतली जाते.

...तर डॉक्टरांना दाखवा

मुलांना ताप येत असल्यास आणि अंगावर पुरळ येत असल्यास लगेच फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बदलत्या हवामानामुळे गोवर संशियत आजार निर्माण होण्याची शक्यता असते. पालकांनी अशा वेळी लगेच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून याबाबत विचारणा करावी. म्हणजे डॉक्टरांना उपचार करण्यास सोेपे होईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.

घाबरण्याचे कारण नाही...

एक ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांना ताप येणे, अंगावर पुरळ आल्यास घाबरण्याचे काही एक कारण नाही. अशा वेळी पालकांनी घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा. ताप अधिक वाढू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधोपचार करून घ्यावेत.

- डॉ. सचिन भायेकर, जिल्हा लसीकरण अधिकारी

Web Title: Fever at the age of 15, Acne can be measles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.