सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वास प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 07:04 PM2018-07-09T19:04:45+5:302018-07-09T19:06:22+5:30
सेनगाव येथील बाजार समितीच्या ९ संचालकांनी आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
हिंगोली : सेनगाव येथील बाजार समितीच्या ९ संचालकांनी आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
या बाजार समितीत सुरुवातीपासूनच राजकीयदृष्ट्या उलथापालथ होत राहिली आहे. काँग्रेस, भाजप, सेनेच्या काही मंडळीत सभापती पदासाठी काही करार झाला आहे. यातून काही दिवसांपूर्वी सभापतीपदी काँग्रेसचे डॉ.नीळकंठ गडदे यांना संधी मिळाली. दरम्यान, ज्या चार संचालकांना अपात्र ठरविले त्यांचे पद कायम ठेवण्याचा निर्णय आल्याने पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला.
बाजार समितीत मालाचे बीट वेळेवर होत नाही. शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. संचालक मंडळाची सभा वेळेवर होत नाही, संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप १६ पैकी ११ जणांनी केले. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात येत या नाराज संचालकांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ मधील कलम २३ अ प्रमाणे सभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
यावर अमोल चंद्रकांत हराळ, गोदावरी बाबाराव शिंदे, संजय बालासाहेब देशमुख, शंकर घनश्याम बोरुडे, श्रीकांत सखाराम कोटकर, गोपाळ देशमुख, सोमित्रा दत्तराव नरवाडे, संतोष रामेश्वर इंगोले, गिरीधारी जानकीलाला तोष्णीवाल, इंदूबाई बालासाहेब देशमुख या संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.