हिंगोलीत फिल्मी स्टाइल चोरी; लाखोंची रोकड असलेली बँकेची तिजोरी, सीसीटीव्हीसह लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:32 IST2025-01-20T16:18:36+5:302025-01-20T16:32:20+5:30
कुरुंदा येथे मध्यवर्ती बँक शाखेची तिजोरीच चोरट्यांनी पळविली

हिंगोलीत फिल्मी स्टाइल चोरी; लाखोंची रोकड असलेली बँकेची तिजोरी, सीसीटीव्हीसह लंपास
कुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची तिजोरी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फिल्मस्टाइल पळविली. या तिजोरीतून सात लाख रुपयांची रक्कम लंपास झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, तिजोरीबरोबर सीसीटीव्ही कॅमेरेही पळविले गेले आहेत. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
१८ जानेवारी रोजी मध्यरात्री कुरूंदा बँक शाखेचे मुख्य शटर वाकवून चोरटे आत घुसले. यानंतर चोरट्यांनी बँकेतील तिजोरी पळविली. चोरट्यांनी पळविलेल्या तिजोरीत जवळपास सात लाख रुपये रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक कृष्णकांत कोकाटे, उपविभागीय अधिकारी अंबादास भुसारे, गुन्हे अन्वेषण विभागाचे घेवारे, सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे आदिंनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथक, ठसेतज्ज्ञांना पाचरण करण्यात आले होते. चोरी करणारी ही टोळी सराईत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, चोरीच्या तपासासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. गावातील तसेच इतर मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जाणार आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. शनिवारी मध्यरात्री चोरी झाली. परंतु, हा प्रकार रविवारी सकाळी निदर्शनास आला. फिल्मी स्टाइल चोरीच्या घटनेमुळे गावात घबराट पसरली आहे. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तिजोरी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेतील तिजोरी पळविल्याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात दुपारी ४:१८ वाजेदरम्यान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर तिजोरीत ७ लाख १८ हजार ४६० रुपये होते. चोरट्यांनी तिजोरी पळविल्याप्रकरणी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी तेजेराव पाटील यांनी कुरुंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.