वसमतमध्ये फिल्मी स्टाईल थरार; एकमेकांवर रोखले पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:25 AM2021-01-14T04:25:32+5:302021-01-14T04:25:32+5:30

वसमत : शहर बुधवारी ‘फिल्मी स्टाईल’ थराराने हादरले. धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करणाऱ्या दोघांनी अचानक खिशातून स्वयंचलित पिस्तुल काढून ...

Filmy style thriller in Wasmat; Pistols aimed at each other | वसमतमध्ये फिल्मी स्टाईल थरार; एकमेकांवर रोखले पिस्तूल

वसमतमध्ये फिल्मी स्टाईल थरार; एकमेकांवर रोखले पिस्तूल

Next

वसमत : शहर बुधवारी ‘फिल्मी स्टाईल’ थराराने हादरले. धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करणाऱ्या दोघांनी अचानक खिशातून स्वयंचलित पिस्तुल काढून एकमेकांवर रोखले. ते गोळीबार करण्याच्या तयारीत असताना अचानक वसमतचे सपोनि पी. सी. बोधनपोड हे घटनास्थळी दाखल झाले. समयसूचकता दाखवत त्यांनी स्वत:जवळचे रिव्हॉल्व्हर काढून त्या दोघांवर रोखत त्यांना ताब्यात घेतले. एक पिस्तुल तर व दुसऱ्या पिस्तुलचे मॅगझिन पोलिसांच्या हाती लागले आहे.

वसमत शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ऑटोमोबाईल व सर्व्हिस सेंटरवर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत धारदार शस्त्र व कत्तीचा वापर झाला. कत्तीने वार झाल्याने एकजण रक्तबंबाळ झाला होता. राष्ट्रीय महामार्गावरच हा थरार सुरू असल्याने प्रचंड गर्दी जमा झाली होती. हाणामारी करणाऱ्या दोघांनी अचानक स्वत:जवळ असलेले पिस्तुल काढले. चक्क दोन पिस्तुल बाहेर निघाल्याने बघ्यांची गर्दी सैरावैरा पळत सुटली. त्याचवेळी ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्तासाठी आयटीआयकडे वसमतचे सपोनि पी. सी. बोधनपोड जात होते. रस्त्यावर धावणारी गर्दी व हाणामारी पाहून ते गाडीतून खाली उतरले तेव्हा समोर पाहतात तर दोनजण एकमेकांवर पिस्तुल रोखत आव्हान देत असल्याचे दिसले. प्रसंग ओळखून बोधनपोड यांनी त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर काढून दोघांवर ताणली. शस्त्र खाली न टाकल्यास गोळी चालवेन, अशी धमकी देत एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिस्तुल जप्त केले. दुसऱ्याला पकडत असताना त्याच्या पिस्तुलचे मॅगझिन पोलिसांच्या हाती आले. एखाद्या हिंदी चित्रपटाला साजेसा हा थरार वसमतमध्ये राष्ट्रीय महामार्गावर घडला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सपोनि श्रीदेवी पाटील यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला. परिसराची झडती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या हाणामारीत एकजण जखमी झाला असून त्यास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुसरा एक आरोपी पाेलिसांच्या ताब्यात आहे. अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. हा एवढा राडा होण्यामागचे कारण काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाद धुमसत होता. त्यातून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

या घटनेतील एक आरोपी सईद फारूखी हा जखमी आहे. तर सर्फराज फारूखी, सय्ययद रियाज हे पाेलिसांच्या ताब्यात आहेत. चौथा आरोपी पिस्तूलसह फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी आरोपींकडून पोलिसांनी एक स्वयंचलित पिस्तुल, दोन मॅगजीन, एक राऊंड (गोळी), एक कुऱ्हाड व एक कत्ती अशी शस्त्रे जप्त केली आहेत. या घटनेने शहर हादरले आहे. भांडणात जर दोन पिस्तुल निघतात तर असे कित्येक पिस्तुलधारी वसमतमध्ये आहेत, याचीच चर्चा होत आहे. एवढे घातक शस्त्र वापरले जात असताना आजवर पोलिसांना कसे काय समजले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस निरीक्षक पी.सी. बोधनापोड हे जर घटनास्थळी वेळीच पोहोचले नसते तर एखादा तरी मुडदा नक्कीच पडला असता. धाडशी कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी पी. सी. बोधनापोड यांचे कौतुक होत आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक बोधनापोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी निवडणूक बंदोबस्त कामी जात होतो. गर्दी पाहून थांबलो असता दोन पिस्तुल पाहून मीही हादरलो. त्वरित माझी रिव्हॉल्व्हर काढून रोखली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या पिस्तुलाचा शोध पोलीस घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या अधिकाऱ्यांना देणार रिवार्ड

या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेत धाडशी कारवाई करणारे सपोनि बोधनापोड व त्यांच्या सहकाऱ्यांचा रिवार्ड देऊन गौरव करणार असल्याचे सांगितले. वसमतमध्ये शोधमोहीम राबवून अजून किती जणांकडे अशी शस्त्रे आहेत. त्याचा शोध घेऊन गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. वसमतमधील गुन्हेगारीचा बीमोड करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Filmy style thriller in Wasmat; Pistols aimed at each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.