भूमिगत गटार जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:55 AM2019-01-22T00:55:34+5:302019-01-22T00:56:23+5:30

शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम सद्यस्थितीत ९० टक्के पूर्ण झाले असून मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहर नालीमुक्त होणार आहे.

 Final phase of the work of underground sewage treatment project | भूमिगत गटार जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

भूमिगत गटार जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम सद्यस्थितीत ९० टक्के पूर्ण झाले असून मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहर नालीमुक्त होणार आहे.
भूमिगत गटार योजनेच्या कामाला ६९ कोटींचा प्रस्तावित खर्च असून आतापर्यंत ४० कोटींचा खर्च झाला आहे. त्यामध्ये १२५ कि.मी. मल:निस्सारण वाहिन्यांपैकी १०५ कि.मी. वाहिन्या शहरात टाकल्या आहेत. भूमिगत गटार योजनेचे शहरात दोन उपप्रकल्प तर एक मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यापैकी एक आझम कॉलनी तर दुसरा कयाधू नदीशेजारील महादेव मंदिर परिसरात उभारला आहे. या दोन प्रकल्पांत सांडपाणी साठवून ते विद्युत पंपाद्वारे मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पात आणून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करुन ते कयाधू नदीत सोडले जाणार आहे. हे पाणी शेती व उद्योग व्यवसायासाठीही उपयोगात आणता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी हाऊस कनेक्शन चेंबर बनवण्यात आले असून या चेंबरला नागरिकांना कनेक्शन जोडून घ्यावे लागणार आहे.
घरातील स्वयंपाकगृह, स्नानगृह व संडासचे कनेक्शनही या चेंबरला जोडता येणार आहे. त्यामुळे शहरातील शोषखड्डे नामषेश होणार आहेत. शहरात नाल्यांमधून केवळ पावसाळ्यातच पाणी वाहणार आहे. हिवाळा आणि उन्हाळ्यात नाल्या पूर्णपणे कोरड्या असणार आहेत. बांधकामाचे काम जवळपास ९0 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. आता तांत्रिक व मशिनरीचे काम तेवढे पूर्ण होणे बाकी आहे. ते लवकरच हाती घेतले जाणार आहे.
खतनिर्मिती होणार
या प्रकल्पात येणाऱ्या मलापासून खतनिर्मिती करता येणार आहे. अनेक महानगरपालिका अशा खताची विक्रीही करतात. याशिवाय पाणीही एवढे शुद्ध असते की ते उद्योगांना वापरता येणे शक्य आहे. अनेक ठिकाणी असा प्रयोग केला जातो. शेती व नगरपालिकांच्या उद्यानासाठी तर पाण्याचा चांगला उपयोग करता येणार असल्याचेही सांगण्यात आले.
असे होणार जलशुद्धीकरण
प्रकल्पात साठवलेल्या सांडपाण्यावर चार टप्प्यांत प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा प्रायमरी ट्रिटमेंट युनिट, दुसरा एसबीआर बेसिन, तिसरा क्लोरिन ट्रीटमेंट युनिट व नंतर निर्जंतुकीकरण होऊन पाणी कयाधू नदीत सोडले जाणार आहे. जलशुद्धीकरणाची प्रक्रिया ‘सी-टेक टॅक्टॉलॉजी’ पद्धतीने शास्त्रशुद्धरीत्या होणार असल्याने प्रकल्प परिसरात दुर्गंधी येणार नाही. या प्रकल्पाची पाणी साठवणूक क्षमता १५ एमएलडी म्हणजेच १५ दसलक्ष लिटर आहे. भविष्यात या जलशुद्धीकरण प्रकल्पावर तीन कर्मचारी काम करणार आहेत. सर्व यंत्रणा स्वयंचलित असल्याने मनुष्यबळाची गरज भासणार नसल्याचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश वारघडे यांनी सांगितले.
भूमिगतसाठी एकूण मनुष्यबळ
भूमिगत गटार योजनेचे काम एप्रिल २०१७ साली सुरु करण्यात आले आहे. तांत्रिक कर्मचारी ३० मशिनरीवरील कुशल कर्मचारी ८३, मुकादम १५, मजूर १५० अशी एकूण २७८ कर्मचारी काम करत असून २३ मशिनरी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
कयाधू नदीशेजारील शेतकºयांना दिलासा
शहरातील सांडपाणी थेट कयाधू नदीत सोडले जात असल्याने नदी दूषित झाली आहे. त्यामुळे नदीजवळील गावांना अनेक वर्षांपासून दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांसह जनावरांनाही या दूषित पाण्यामुळे अनेक आजार बळावले आहेत. यानंतर शहरातील सांडपाणी शुद्ध करुन कयाधू नदीत सोडले जाणार असल्याने नदीजवळील शेकडो गावांना दिलासा मिळणार आहे, असे सहायक अभियंता अश्वजित बनसोडे व तांत्रिक सहायक अनिल भगत यांनी सांगितले.

Web Title:  Final phase of the work of underground sewage treatment project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.