अखेर ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:49+5:302021-05-28T04:22:49+5:30
हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जुन्या रुग्णवाहिका मोडकळीस आल्याने आरोग्य विभागाने जि.प.च्या सेससह जिल्हा नियोजन समिती, मानव विकासकडे प्रस्ताव ...
हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जुन्या रुग्णवाहिका मोडकळीस आल्याने आरोग्य विभागाने जि.प.च्या सेससह जिल्हा नियोजन समिती, मानव विकासकडे प्रस्ताव सादर केले होते. मात्र यापैकी एकाही ठिकाणाहून निधी मिळाला नव्हता. २४ सध्याचे व नवीन ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी २७ रुग्णवाहिकांचा प्रस्ताव होता. लवकरच जिल्हा नियोजनमधून याला निधी मिळेल, असे सांगितले जात होते. मात्र नंतर शासनाने मागविलेल्या प्रस्तावानुसार १६ रुग्णवाहिका मंजूर झाल्याचे सांगितले जात होते. त्यापैकी ९ रुग्णवाहिकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या रुग्णवाहिका संबंधित एजन्सीकडून थेट प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाठविण्यात येत आहेत. तीन रुग्णवाहिका आज रुजू झाल्या. दोन दिवसांत पूर्ण ९ येतील. यात वसमत तालुक्यातील गिरगाव, कळमनुरी तालुक्यात रामेश्वर तांडा, मसोड, औंढा तालुक्यात सिद्धेश्वर, लोहरा, पिंपळदरी, हिंगोली तालुक्यात सिरसम, सेनगाव तालुक्यात साखरा व कवठा या ठिकाणी रुग्णवाहिका मिळणार आहे.
साखरा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे प्रात्यक्षिक जि.प.त घेण्यात आले. यावेळी सीईओ शर्मा यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनोज पाते, डॉ. जोगदंड, विस्तार अधिकारी भोजे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.