अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांसाठी काढले सुधारित आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:12+5:302021-04-23T04:32:12+5:30
हिंगोली : राज्य शासनाने ब्रेक दी चेन या मोहिमेत सुधारित आदेश जाहीर केले तरीही हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश ...
हिंगोली : राज्य शासनाने ब्रेक दी चेन या मोहिमेत सुधारित आदेश जाहीर केले तरीही हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश न काढल्याने अनेक दुकानदार वाद घालताना दिसत होते. त्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनीही आदेश काढून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ याच वेळेत चालू राहतील, असे म्हटले आहे.
या आदेशात म्हटले की, २० एप्रिल ते १ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. यात किराणा दुकाने, भाजीपाला, फळ, दूध, बेकरी, मिठाई व सर्व प्रकाराचे अन्न विक्रेते (चिकन, मटन, अंडी, पोल्ट्री, मासे), कृषी अवजारे, शेतीमाल, पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगामपूर्व साहित्य (वैयक्तिक/संस्थेसाठी) विक्रेते ही दुकाने फक्त सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल. तर वरीलपैकी जे घरपोच सेवा देतात, त्यांनी ती सकाळी ७ ते रात्री आठ वाजेपर्यंत देण्यास मुभा आहे. यासाठी विविध अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
कार्यालयीन उपस्थिती १५ टक्क्यांवर
सर्व शासकीय केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचारी उपस्थिती १५ टक्के राहील; परंतु फक्त कोविड संदर्भातील अत्यावश्यक सेवेच्या कार्यालयांना हा नियम लागू नाही. ज्यांना यापेक्षा जास्त उपस्थिती लागेल त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून परवानगी घेणे आवश्यक आहे, तर ती ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. आवश्यकतेनुसारच १०० टक्के ठेवता येईल.
लग्न समारंभ
लग्न समारंभ हे दोन तासांच्या मर्यादित कालावधीत पार पाडावेत. एकाच हॉलमध्ये जास्तीत जास्त २५ जणांच्या उपस्थितीत पार पाडता येतील. याचे उल्लंघन केल्यास ५० हजारांचा दंड लावण्यात येईल. तसेच हॉल सील करून परवाना कोविड संपेपर्यंत रद्द केला जाईल.
खाजगी व सार्वजिनक प्रवासी वाहतूक
खाजगी प्रवासी वाहतूक बस सोडून फक्त निकडीचे किंवा अत्यावश्यक सेवेसाठी किंवा वैध कारणासाठी प्रवासी क्षमतेच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेत प्रावास करता येईल. जिल्हांतर्गत शहरात प्रवास करता येणार नाही. मात्र, अंत्यविधी किंवा कुटुंबातील गंभीर आजारी व्यक्तीसाठी प्रवास करता येईल. नियमाचे उल्लंघन केल्यास दहा हजारांचा दंड लावण्यात येईल. खाजगी प्रवासी बस प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत प्रवासी वाहतूक करू शकतील. उभे राहून प्रवास करता येणार नाही. शहरात दोन थांबे निश्चित करून त्याची माहिती प्राधिकरणाला सादर करावी लागेल. प्रवासी उतरल्यावर १४ दिवस विलगीकरणाचा शिक्का मारण्याची जबाबदारी वाहनधारकांची राहील. थर्मल गनने प्रवाशांची तपासणी करून कोरोना लक्षणे आढळल्यास त्या प्रवाशास कोरोना केअर सेंंटरला हलवावे. प्रवासी उतरण्याच्या ठिकाणी उतरणऱ्या प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्यात येणार असून यासाठीचा खर्च प्रवासी अथवा वाहनधारकांनी करायचा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही वरील खाजगीचेच नियम लागू आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यास दहा हजारांचा दंड आकारला जाईल.