अखेर १०० ई-पॉसवर धान्यसाठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:20+5:302021-05-26T04:30:20+5:30
हिंगोली तालुक्यात मागील काही दिवसांपासून चौकशांचा ससेमिरा सुरू असल्याने या विभागातील काहींच्या इतरत्र बदल्या झाल्या आहेत. मात्र, त्याचा परिणाम ...
हिंगोली तालुक्यात मागील काही दिवसांपासून चौकशांचा ससेमिरा सुरू असल्याने या विभागातील काहींच्या इतरत्र बदल्या झाल्या आहेत. मात्र, त्याचा परिणाम म्हणून नियमित कामकाज ढेपाळले आहे. धान्य गोदामातून दुकानाकडे गेल्यानंतर ते ई-पॉस मशिनवर उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यानंतरच वाटप करणे शक्य होते. शिवाय ज्या महिन्याचे वाटप त्याच महिन्यात न झाल्यास पुढे ई-पॉसवर हे धान्य दिसत नाही. मात्र, मागील महिन्यात व या महिन्यातही सुरुवातीचे वीस ते बावीस दिवस ई पॉस मशिनवर धान्यसाठाच दिसत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना वाटपच करता आले नाही. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर यंत्रणा हलली. त्यानंतर कालपासून जवळपास १०० मशिनवर धान्यसाठा उपलब्ध झाला आहे. आता या दुकानांत धान्याचे वाटप सुरू झाले आहे. आता आठ दिवसांत पूर्ण गावाचे धान्य वाटप करण्याची कसरत करायची आहे. शिवाय कोरोनाचे निर्बंधही पाळायचे आहेत. अशा दुहेरी कचाट्यात दुकानदार व लाभार्थी सापडले आहेत. आणखी ६० ते ६५ दुकानांच्या ई-पॉसवर धान्यसाठाच उपलब्ध नाही. लवकरच या मशिनवरही साठा उपलब्ध होणार आहे.