अखेर हिंगोली जिल्हा झाला हगणदारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:14 AM2018-02-20T01:14:01+5:302018-02-20T01:14:07+5:30
जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांनी बेस लाईन सर्व्हेतील उद्दिष्ट पूर्ण करून हिंगोली जिल्हा हगणदारीमुक्त घोषित होण्यासाठी मोलाचा हातभार लावला. फोटो अपलोडिंगचे काम तेवढे बाकी असल्याने शासन स्तरावर घोषणा होणे बाकी असले तरीही जि.प. स्तरावर त्याची घोषणा झाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांनी बेस लाईन सर्व्हेतील उद्दिष्ट पूर्ण करून हिंगोली जिल्हा हगणदारीमुक्त घोषित होण्यासाठी मोलाचा हातभार लावला. फोटो अपलोडिंगचे काम तेवढे बाकी असल्याने शासन स्तरावर घोषणा होणे बाकी असले तरीही जि.प. स्तरावर त्याची घोषणा झाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी दिली.
सीईओ तुम्मोड यांनी हगणदारीमुक्तीसाठी मागील वर्षभरापासून नियोजन केले होते. अधिकाºयांना गावे दत्तक देण्यापासून ते इतर जिल्ह्यांतील संपूर्ण स्वच्छता अभियानातील कर्मचाºयांची मदत घेण्यापर्यंत सर्वच प्रकारच्या कामाकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले होते. तरीही जानेवारीपूर्वी जिल्हा हगणदारीमुक्त होण्यात काही पंचायत समित्यांच्या धिम्या गतीच्या कामांमुळे अडचणी आल्या होत्या. तर मध्यंतरी निधीच नसल्याने प्रोत्साहन अनुदानाअभावी लाभार्थ्यांनी या कामांकडे दुर्लक्ष केले होते. शिवाय वाळू मिळत नसल्याचाही फटका या कामांना बसला होता. या सर्वांवर मात करून फेब्रुवारी २0१८ मध्ये मात्र खºया अर्थाने जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये २0१२ च्या बेसलाईन सर्व्हेनुसार जिल्ह्यात एकूण १.८१ लाख कुटुंबांकडे शौचालय बांधकाम झालेले नसल्याचे आढळून आले होते. यात औंढा-३२ हजार २६, वसमत ३९ हजार ८९२, हिंगोलीत ३४ हजार ४0८, कळमनुरीत ३८ हजार ३२७ तर सेनगावात ३६ हजार ८५१ शौचालयांचे बांधकाम होणे अपेक्षित होते. मात्र २0१७-१८ या आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला जवळपास ८0 शौचालयांचे बांधकाम होणे बाकी होते. मागील वर्षभरात यावर मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने या सर्व १.८१ लाख शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात एकूण ५६३ ग्रामपंचायती असून त्या सर्व हगणदारीमुक्त झाल्या आहेत. त्यापैकी ४२९ ग्रामपंचायती यंदा हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये औंढ्यात १0१ पैकी ६४, हिंगोलीत १११ पैकी ८१, वसमतला ११९ पैकी ७६, कळमनुरीत १२५ पैकी १0३, सेनगावात १0७ पैकी ९७ गावांत शौचालय बांधकाम उद्दिष्टपूर्ती चालू आर्थिक वर्षात झाली आहे.
हगणदारीमुक्त गावात केवळ आता वाढीव वस्त्यांचे व सर्वेबाहेरील कुटुंबांच्या शौचालयाचे बांधकाम होणे बाकी राहिले आहे. आगामी काळात अशांकडे शौचालय बांधकाम होणे बाकी असल्यास त्यांच्यातही जनजागृती केली जाईल. सर्व अर्थाने जिल्हा हगणदारीमुक्त व्हावा, ही अपेक्षा असून आरोग्यदायी जीवनासाठी ते गरजेचे असल्याचे सीईओ तुम्मोड यांनी सांगितले.
जिल्ह्यात २0१४ नंतर बांधलेल्या शौचालयांची संख्या १.१९ लाख एवढी आहे. यापैकी ७८ हजार १५९ छायाचित्रे शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहेत. दररोज पाचशे ते हजार छायाचित्रे अपलोड करण्यात येत आहेत. मात्र अजूनही ४१ हजार छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करणे बाकी आहे. यात हिंगोली-५१८, वसमत-७७0७, औंढा ना.-६३३७, सेनगाव १0 हजार २0९, कळमनुरीत ११ हजार ६५३ एवढ्या शौचालयांची छायाचित्रे शासन वेबसाईटवर अपलोड करणे बाकी आहे. हे काम पूर्ण झाले की, शासन स्तरावरही जिल्हा हागणदारीमुक्त होईल, असे सीईओ तुम्मोड यांनी सांगितले.