अखेर हिंगोली न.प.ला २३.८0 कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:33 AM2018-04-01T00:33:02+5:302018-04-01T00:33:02+5:30
नगरपालिका निवडणुकीच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेला २५ कोटींचा निधी आश्वासनातच विरतो की काय? अशी चर्चा होत होती. मात्र मार्चअखेर २३.८0 कोटी रुपयांचे आदेश निघाले आहेत. अर्थमंत्र्यांनी आश्वासन पाळले असून शहर विकासाला गती मिळेल, असे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगरपालिका निवडणुकीच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेला २५ कोटींचा निधी आश्वासनातच विरतो की काय? अशी चर्चा होत होती. मात्र मार्चअखेर २३.८0 कोटी रुपयांचे आदेश निघाले आहेत. अर्थमंत्र्यांनी आश्वासन पाळले असून शहर विकासाला गती मिळेल, असे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
हिंगोली शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पालिका ताब्यात आल्यास लागलीच २५ कोटींचा निधी देण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी जाहीर केले होते. त्याचे प्रस्तावही पालिकेने पाठविले होते. मात्र निधी येत नव्हता. त्यामुळे ही निवडणुकीची जुमलेबाजी होती, अशी चर्चा रंगत होती. मात्र प्रत्यक्ष निधी वितरण आदेश प्राप्त झाल्याने आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
याबाबत नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले की, शहर विकासासाठी केवळ २५ कोटीच नव्हे, तर आणखी २५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिलेले आहे. हा निधी खर्च झाला की, लगेच दुसरा टप्पाही मिळणार आहे. या निधीसाठी पालकमंत्री दिलीप कांबळे, आ.तान्हाजी मुटकुळे यांनीही पाठपुरावा केला. यातून स्मशानभूमि विकसित करण्यासाठी २.६१ कोटी, शिवाजीराव देशमुख सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी ३.६९ कोटी, न.प.च्या प्रशासकीय इमारतीसाठी १0.१२ कोटी, नाट्यगृहासाठी ७.३७ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. आता या कामांच्या निविदा लवकरच काढण्यात येतील, अशी माहिती नगराध्यक्ष बागंर, मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली.
रस्त्यांसाठी पाठपुरावा सुरू-बांगर
भूमिगत गटार योजनेचे काम शहरात सुरू असल्याने विविध भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे रस्ते विकासाचा १५0 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. आगामी काळात तोही लवकरच मंजूर होईल, असे नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले.