अखेर बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:55 PM2018-05-28T23:55:33+5:302018-05-28T23:55:33+5:30
मागील अनेक वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. इमारत बांधकामासाठी आगाराकडून हालचाली सुरू झाल्या असून प्रभारी आगारप्रमुख यांनी स्थानकातील आस्थापनेअंतर्गत येणारी दुकाने व हॉटेलचालकांनाही याबाबत नोटिसा दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील अनेक वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. इमारत बांधकामासाठी आगाराकडून हालचाली सुरू झाल्या असून प्रभारी आगारप्रमुख यांनी स्थानकातील आस्थापनेअंतर्गत येणारी दुकाने व हॉटेलचालकांनाही याबाबत नोटिसा दिल्या आहेत. साडेचार कोटी रुपयांचा खर्च करून या ठिकाणी बसस्थानकाची टोलेजंग इमारत उभी राहणार आहे.
हिंगोली बसस्थानकाची इमारत जिर्ण झाल्याने ती पाडून नवीन इमारतीचे सुसज्ज बांधकाम केले जाणार आहे. बांधकामासाठी साडेचार कोटींचा खर्च येणार असून यापूर्वीच निधीस मंजुरी मिळाली होती. मागील अडीच वर्षांपासून नवीन इमारतीचा प्रस्ताव परभणी येथील विभागीय कार्यालयात पडून होता. ई-निविदा तसेच इतर तांत्रिक अडचणींमुळे येथील नवीन इमारतीच्या बांधकामास मुहूर्त मिळत नव्हता. परंतु उशिराने का होईना आता, नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला असून ३१ मेपर्यंत हिंगोली आगाराअंतर्गत येणारे हॉटेल व दुकाने काढून घेण्यात येणार आहेत. याबाबत संबंधितांना आगरप्रमुख बी. बी. झरीकर यांनी नोटिसाही दिल्या आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जुने बसस्थानक पाडून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत उभी राहण्यास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे आता हिंगोलीकरांना आगारातील विविध सुविधांचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे. जुने स्थानक पाडल्यानंतर लवकरच बांधकामास प्रांरभ केला जाईल, असे विभागीय नियंत्रक सिरसाट यांनी सांगितले.
विविध तांत्रिक अडचणी व जागेच्या प्रश्नामुळे हिंगोली येथील नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव दीड ते दोन वर्षांपासून गुलदस्त्यातच होता. विभागीय कार्यालय परभणी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानकास अनेकदा भेटीही दिल्या होत्या. परंतु इमारत बांधकामाचा प्रश्न प्रलंबितच होता. बसस्थानकाची जिर्ण इमारत पूर्णत: मोडकळीस आली आहे. शिवाय येथील असुविधांमुळे समस्यांचे माहेरघर बनत चालले असून विशेष म्हणजे स्थानकातील साफसफाईचा प्रश्नही गंभीर आहे. मागील अनेक वर्षांपासून स्थानकाची साधी रंगरंगोटीही करण्यात आली नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकात ये-जा करणाºया प्रवाशांचीही मोठी वर्दळ असते. शिवाय इतर आगारांच्या तुलनेत हिंगोली आगाराचे उत्पन्नही अधिक आहे. परंतु नवीन इमारतीचा प्रश्न मार्गी लागत नव्हता.