अखेर ग्रामीण रुग्णालय नवीन इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:19 AM2018-07-03T00:19:53+5:302018-07-03T00:20:23+5:30
तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सेनगाव ग्रामीण रुग्णालयाचे नव्याने बांधकाम केलेल्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले हे स्थलांतर आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे कोणताही गाजावाजा, उद्घाटन न करताच करण्याची नामुष्की ओढवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सेनगाव ग्रामीण रुग्णालयाचे नव्याने बांधकाम केलेल्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले हे स्थलांतर आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे कोणताही गाजावाजा, उद्घाटन न करताच करण्याची नामुष्की ओढवली.
सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इमारत मिळाली आहे. रुग्णालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्याने सेनगावचे ग्रामीण रुग्णालय प्राथमिक औषधोपचार केंद्र बनले होते. ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे रुग्णांना सरळ रेफर करण्याचा उद्योग सेनगावात चालू आहे. ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात कोणत्याच सुविधा नसल्याने बाह्य व आंतर रुग्ण विभाग कायम ओस पडून राहत आहे. हा सर्व प्रकार नवीन इमारतीमध्ये रुग्णालय गेल्यानंतर थांबेल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये पाच दिवसांपूर्वी कोणताही गाजावाजा न करता रुग्णालयाचा कारभार कार्यान्वित झाला; पंरतु या इमारतीमध्ये आवश्यक आधुनिक सुविधा, यंत्रसामुग्री, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाºयांची संख्या पुरेशी नसल्याने रुग्णालयाचा कारभार आहे त्या स्थितीच आहे.
रुग्णालयात आवश्यक तातडीच्या सुविधा अद्यापही उपलब्ध झाल्या नाहीत. नवीन इमारतीमध्ये रुग्णालयाचा कारभार सलाईनवर चालणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सेनगाव ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकाºयांची सर्व पदे तातडीने भरुन ग्रामीण रुग्णालयात मिळणाºया सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी रुग्णांमधून होत आहेत.
ट्रामा क्रेअर सेंटर देण्याची गरज
सेनगाव तालुका दुर्गम भागात वसलेला तालुका आहे. अपघातग्रस्तांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा तालुक्यात हिगोलीशिवाय उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना वेळीच आरोग्य सुविधा, उपचार मिळाले नसल्याने उपचाराअभावी अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेनगाव ग्रामीण रुग्णालयात ट्रामा क्रेअर सेंटर सुरू केल्यास अपघातग्रस्तांसाठी तातडीने उपचार मिळतील. सदर युनिट सेनगाव येथे सुरु करावे, अशी मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.