अखेर शिबू पुजारीलाही केले अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:35 AM2018-12-04T00:35:36+5:302018-12-04T00:35:54+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुब्रमण्यमा ऊर्फ शिबूअप्पा चन्नाअप्पा मढिवाल ऊर्फ पुजारी (२९) (रा.हडीगुल, ता. थिरथाहली, जि.शिवमोगा, कर्नाटक) यास सेनगाव पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे अखेर अकरा महिन्यानंतर हडीगुल येथून ताब्यात घेतले. रविवारी दुपारी तीन वाजता ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुब्रमण्यमा ऊर्फ शिबूअप्पा चन्नाअप्पा मढिवाल ऊर्फ पुजारी (२९) (रा.हडीगुल, ता. थिरथाहली, जि.शिवमोगा, कर्नाटक) यास सेनगाव पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे अखेर अकरा महिन्यानंतर हडीगुल येथून ताब्यात घेतले. रविवारी दुपारी तीन वाजता ही कारवाई केली.
तालुक्यातील वडहिवरा येथील माजी पंचायत समिती सदस्य व बाजार समिती संचालक सर्जेराव पोले (५५) यांचा एक जानेवारी २0१८ रोजी अपहरण करुन खून केला होता. जमिनीच्या वादातून अत्यंत शिताफीने सुपारी देवून घडलेल्या या प्रकाराने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या खुनाचा सेनगाव पोलिसांनी ४८ तासांत उलगडा केला होता. पंरतु प्रमुख मारेकरी मात्र सापडत नव्हते. तपास अधिकारी या खून प्रकरणातील आरोपी शरण येण्याची तर वाट पाहत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला होता. यात पोलिसांनी रतन हरिभाऊ खटके (रा.रामपुरी, ता.पाथरी) याच्यासह विजय देवकर, हरीश बाबूराव मिरेकर, इम्रान युनूस शेख सर्व रा.नाशिक यांना सुरवातीला अटक केली होती. त्यानंतर सुपारी देणारा मुख्य आरोपी हरिभाऊ सातपुते रा.नाशिक यास तब्बल दहा महिन्यानंतर अटक केली होती. तर दुसरा प्रमुख आरोपी शिबूअप्पा अद्याप फारार होता. मागील अकरा महिन्यापासून त्याचा शोध सुरू होता. पंरतु कोणतेही धागधोरे हाती लागत नव्हते. सदर आरोपी कर्नाटक राज्यातील असल्याने तपासात मोठी अडचण येत होती.
आरोपीचा शोधासाठी पोलिसांनी आरोपीचे सध्याचे वास्तव्य असलेल्या नाशिक व परिसरात मोठ्या प्रमाणात शोध घेतला. पंरतु तो सापडत नव्हता. त्याच्या मूळ गावाचा शोध लागत नव्हता. असे असताना पोलिसांनी आरोपी वापरत असलेल्या मोबाईलचा शोध लावला. त्याआधारे त्याच्या मूळ गावाचा शोध लावला. पोलीस पथकाने नक्षलग्रस्त भागात जावून कानडी भाषेची मोठी अडचण असतानाही रविवारी दुपारी ३ वाजता आरोपीला घरातून ताब्यात घेतले. या आरोपीकडून खून प्रकरणात वापरलेल्या कारचा शोधही पोलीस पथकाने लावला.
सुपारी देणारा आरोपी हरिभाऊ सातपुते याने सुपारीची रक्कम दिली नसल्याने आरोपी शिबूअप्पा हा सुपारीच्या रक्कमेत कारच घेवून गेला होता. पंरतु घटनेनंतर आठच दिवसांनी सदर कारचा कर्नाटकमध्ये अपघात झाला. त्यामुळे खुन प्रकरणातील वाहन अनंतपुरा, जि.शिवमोगा येथे एका गॅरेजवर लावली होती. अखेर सेनगाव पोलिसानी उशिरा का होईना आरोपीस अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सरदार सिंह ठाकूर, पो.काँ.अनिल भारती, मंचक ढाकरे, प्रंशात नरडीले आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली.