अखेर बीडीएस प्रणाली सुरू; भविष्य निर्वाह निधी खात्यातून रक्कम काढता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:42+5:302021-06-25T04:21:42+5:30
हिंगोली : बीडीएस प्रणाली बंद असल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांची बिले थकली होती. अखेर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ...
हिंगोली : बीडीएस प्रणाली बंद असल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांची बिले थकली होती. अखेर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत प्रशासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्याने बीडीएस प्रणाली पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी खात्यातून रक्कम उचलण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते उघडण्यात आलेले आहे. या खात्यात जमा झालेली रक्कम अडचणीच्या वेळी उचलता येते. मात्र, ही रक्कम उचलायची झाल्यास पूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास कालावधी लागतो. त्यातच मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून शासनस्तरावरून बीडीएस प्रणाली बंद करण्यात आल्याने दाखल केलेली बिले अर्थविभागातच रखडली होती. त्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त केला जात होता. बीडीएस प्रणाली सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा निमंत्रित सदस्य सुभाष जिरवणकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, वित्त व लेखा अधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच संघटनेचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनीही राज्याचा वित्त विभाग व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे २२ जूनपासून बीडीएस प्रणाली सुरू झाली आहे. राज्यातील सर्व शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.