...अखेर धरणे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:48 AM2018-05-06T00:48:53+5:302018-05-06T00:48:53+5:30
मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांचे धरणे आंदोलन ५ मे रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांचे धरणे आंदोलन ५ मे रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. शासन दरबारी आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे आक्रमक मजुरांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको केला. यावेळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. हे आंदोलन सलग दोन महिने चालले. शासनही दखल घेत नसल्यामुळे उन्हातान्हात मुलां-बाळांसह आंदोलन सुरूच होते. तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर हे आंदोलन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विनंतीवरून स्थगित करण्यात आले. मौजे धानोरा येथील तक्रारीच्या अनुषंगाने दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. बेरोजगार भत्ता प्रत्येक मजुरास व्यक्तिगतरीत्या देय आहे किंवा नाही, यासंबधी ७ मे रोजी जिल्हाधिकाºयांच्या चर्चेनंतर निर्णय होईल. तसेच हजेरी क्र.३५४५ च्या मजुरीची रक्कम संबधित ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांकडून वसूल करून मजुरांना देण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. आंदोलक मजुरांच्या मागण्यांसंदर्भात लक्ष्मण डुकरे व अॅड विजय राऊत यांनी ५ मे रोजी अर्ज सादर करून चर्चा केली. आंदोलनात सहभागी मजुरांच्या हाताला तात्काळ काम देण्याचे आश्वासनही यावेळी प्रशासनाने दिले. त्यानंतर मजुरांनी आंदोलन स्थगित केले.