अखेर रेल्वे उड्डाणपुलाची निविदा निघाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:17 AM2019-03-15T00:17:44+5:302019-03-15T00:18:07+5:30
हिंगोलीतील खटकाळी येथील रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या कामाची निविदा निघाल्याने नजीकच्या काळात या रस्त्यावरील वाहतुकीचा तिढा सुटणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : हिंगोलीतील खटकाळी येथील रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या कामाची निविदा निघाल्याने नजीकच्या काळात या रस्त्यावरील वाहतुकीचा तिढा सुटणार आहे.
खटकाळी येथील उड्डानपुल नेहमीच वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत होता. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांना याचा मोठा त्रास होत होता. सकाळ व सायंकाळची वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागली होती. या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाच्या कामास केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य खा.सातव यांच्या पाठपुराव्याने केंद्र शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर नांदेड येथे झालेल्या विभागीय बैठकीत यासंदर्भात खासदारांनी मुद्दा उपस्थित केल्यावर या कामास गती मिळाली. आता राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे खटकाळी येथील रेल्वेच्या उड्डाण पुलाच्या कामाची निविदा महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रचर डेव्हलपमेंट कापोर्रेशन लिमिटेडच्या वतीने काढली आहे. यापुर्वीच रेल्वे विभागाकडुन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मुरूमाच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या भागात विशिष्ट अंतरावर ६० ठिकाणी ४० फुटापर्यंत खड्डे करून त्यातुन मुरूम बाहेर काढला जात आहे. सर्व तपासण्या झाल्यानंतर हे काम केले जाणार आहे.