वित्त आयोगाची कामे निधीआधीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:55 AM2017-12-26T00:55:38+5:302017-12-26T00:55:41+5:30
आराखड्यातील कामाची आॅनलाईन नोंदणी केल्याशिवाय ग्रामपंचायतींनी वित्त आयोगातील कामे करू नयेत, असा संकेत असतानाही निधी मिळण्यापूर्वीच ही कामे होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याची बोंब आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आराखड्यातील कामाची आॅनलाईन नोंदणी केल्याशिवाय ग्रामपंचायतींनी वित्त आयोगातील कामे करू नयेत, असा संकेत असतानाही निधी मिळण्यापूर्वीच ही कामे होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याची बोंब आहे. यात अनेक प्रकारच्या मान्यता नंतर घेऊन पांघरुण घालण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे योग्य कामाची निवड होताना दिसत नाही.
शासनाने वित्त आयोगाचा निधी खर्च करताना यावेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अतिशय काटेकोर नियम घातले आहेत. गावपातळीवर विविध प्रकारच्या समित्यांची स्थापना करून कोणत्या बाबींवर किती निधी खर्च करावा, याचे स्पष्ट मार्गदर्शन या आदेशात दिलेले होते. शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, अपंग कल्याण अशा अनेक बाबींना त्यात हात घातला होता. हे आराखडे तयार करतानाही त्यात सर्वांचाच सहभाग राहील, याची काळजी घेतली. समतोल विकासासाठी शासनाने उचललेल्या पावलांना मात्र हरताळ पुसण्याचेच काम सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतींनी हे आराखडे गुंडाळून ठेवले होते. निधी येण्यापूर्वीच सरपंच व सदस्यांना वाटेल त्याप्रमाणेच निधी खर्च करून नंतर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्याचे उलटे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे गटविकास अधिका-यांकडेही तक्रारी येत असून अनेक ठिकाणी ग्रामसेवक व पदाधिका-यांतही खटके उडताना दिसत आहेत. या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी पंचायत समित्या अथवा जिल्हा परिषद मात्र शासन नियमांतच अशी प्रक्रिया करू नये, असे सांगितले आहे. तक्रारी आल्यावर आम्ही त्यात लक्ष घालत असल्याचे सांगत आहे.