उन्हाळी सुटीतील पोषण आहाराच्या मोबदल्यात मिळणार आर्थिक साहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:29+5:302021-06-29T04:20:29+5:30
हिंगोली : उन्हाळी सुटीत देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या बदल्यात विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात धान्याच्या किमतीएवढी रक्कम जमा ...
हिंगोली : उन्हाळी सुटीत देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या बदल्यात विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात धान्याच्या किमतीएवढी रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती मागविण्यात येत आहे.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील पात्र विद्यार्थ्यांना दरमहा तांदूळ व इतर धान्यादी मालाचे वितरण करण्यात येते. जिल्ह्यात कोरोना संसर्ग असतानाही कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला होता. त्यामुळे उन्हाळ्यातही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यांतील ५४ दिवसांचा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला. शिक्षण विभागाने १ मेपासून १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्या जाहीर केल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता या काळातील जवळपास ४४ दिवसांचा पोषण आहार वाटप करण्यात आला नव्हता. त्यामुळे आता केवळ २०२१ च्या उन्हाळी सुटीसाठी विशेष कल्याणकारी उपाय म्हणून शालेय पोषण आहार खर्चाच्या रकमेइतके आर्थिक साहाय्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने पात्र विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्याची माहिती जमा करण्यात सुरवात केली आहे. ज्या विद्यार्थ्याकडे आधार लिंक बँक खाते नाही, अशा विद्यार्थ्यांना बँक खाते काढून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी पालकांना काही मदत लागल्यास शाळेने करावी, तसेच ९ जुलैपर्यंत ही माहिती जिल्हास्तरावर जमा करावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत. शासनस्तरावरून निर्देश येताच ही माहिती शासनाला सादर केली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यास होणार मदत
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे प्रशासनाला कडक उपाययोजना कराव्या लागल्या. आता कुठे कोराेना संसर्ग आटोक्यात येत असताना पुन्हा कोरोना डेल्टा प्लसची लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेंतर्गतचा लाभ थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
शालेय पोषण आहार योजनेतील पात्र शाळा व विद्यार्थी संख्या (२०१९ -२०)
तालुका एकूण शाळा विद्यार्थी
हिंगोली २०४ ३३३७५
वसमत २३१ ४३२६४
कळमनुरी २२१ २९७२७
औंढा ना. १८० २३१२८
सेनगाव १९६ ३०६६९