आर्थिक अडचणी, संशयवृत्तीने शेकडो कुटुंबात कटुता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:25+5:302021-06-09T04:37:25+5:30
हिंगोली : कोरोनामुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय बुडाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार हातचा गेल्याने घरातच थांबावे लागत आहे. यातून ...
हिंगोली : कोरोनामुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय बुडाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार हातचा गेल्याने घरातच थांबावे लागत आहे. यातून पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होत असून, अशा दीड वर्षात ७४१ तक्रारी भरोसा सेलकडे आल्या आहेत. संशय, आर्थिक कारण, कौटुंबिक त्रास, आदी कारणे यामध्ये नमूद करण्यात आली आहेत.
मागील दीड वर्षापासून कोरोनाने सर्वांना जेरीस आणले आहे. छोटे-मोठ्या व्यावसायिकांसह अनेकांचा रोजगार गेला आहे. हाती पैसा येत नसल्याने मानसिकतेवरही परिणाम होत असून, घरी थांबावे लागत असल्याने वादाला सुरुवात होत आहे. त्यातूनच संशयी वृत्ती बळावणे, छोट्या कारणावरूनही मारहाण करणे, आदी प्रकार पती-पत्नीमध्ये उद्भवत आहेत. महिलांच्या छळाचे प्रकार वाढत असून, या तक्रारी थेट पोलीस ठाण्यापर्यंत पर्यायाने न्यायालयापर्यंत जात आहेत. यातून विभक्त होण्याचा टोकाचा निर्णयही घेतला जात आहे. मागील दीड वर्षात येथील भरोसा केंद्राकडे ७४१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. भरोसा केंद्रातील पथक, समुपदेशकामार्फत पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी पुढाकारही घेतला जात आहे.
बॉक्स
२५४ पती-पत्नीमधील भांडण सोडविले
येथील भरोसा सेलकडे महिलांनी तक्रारी केल्यानंतर पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी ठराविक तारखेला समुपदेशनासाठी बोलाविले जाते. २०२० मध्ये ५१० तक्रारी आल्या होत्या. यातील १६१ तक्रारींचे निराकरण करून पती-पत्नीमधील भांडणे सोडविण्यात भरोसा सेलला यश आले आहे, तर २०२१ मे अखेर २३१ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ९३ जणांमध्ये भांडणे सोडविण्यात यश आले आहे.
पैसा, संशय हेच कारण
भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी पैशांमुळे वाद होणे तसेच संशयावरून मारहाण करणे, सासू-सासऱ्याचा त्रास, दारूचे व्यसन, मानसिक तणाव, आदी स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश आहे.
दारूच्या आहारी गेल्याने तक्रार
पती दारूच्या आहारी गेल्याने पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होऊन हे प्रकरण भरोसा सेलकडे आले होते. यावेळी भरोसा सेलमधील समुपदेशकांनी पतीला दारूचे दुष्परिणाम, कुटुंबावर होणारा परिणाम या बाबी समजावून सांगितल्या. दारूचे दुष्परिणाम समजल्याने पती-पत्नीमधील वाद मिटून आता हे जोडपे सुखाने नांदत आहेत.
मानसिक तणावातून मुक्त
येथील भरोसा सेलकडे मानसिकतेतून त्रास होत असल्याचे प्रकरण आले होते. यातूनच पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होत होता. भरोसा सेलच्या पथकाने दोघांनाही समुपदेशनासाठी बोलावून घेत त्यांना मार्गदर्शन केले. तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक डोणेकर यांनीही समुपदेशन केले. यामुळे दोघातील वाद मिटून आता हे दोघेही चांगले वागत आहेत. त्यांचा संसार सुखाने सुरू आहे.
भरोसा सेलकडे तक्रारी आल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पती-पत्नीमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. कोरोनामुळे तक्रारीचे प्रमाण वाढले असले तरी दीड वर्षात २५४ पती-पत्नीमधील वाद मिटविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.
-विशाखा धुळे, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल
भरोसा सेलमध्ये जानेवारी २०२० पासून आलेल्या एकूण तक्रारी- ७४१
जानेवारी २०२१ पासून आलेल्या तक्रारी- २३१