हिंगोली लोकसभेवरून रंगले कार्यकर्त्यांमध्ये फेसबूकवॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:46 PM2019-03-15T23:46:15+5:302019-03-15T23:46:37+5:30

लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडी वगळता कोणाचाही उमेदवार जाहीर झाला नसल्याने जागा कोणत्या पक्षाला जाईल? उमेदवार कोण राहील? याबाबत फेसबूकवर चर्चा झडताना दिसत आहेत. त्यातच मतदारसंघ सेनेऐवजी भाजपला सुटल्याच्या चर्चांनी वातावरण अधिकच गढूळ झाले.

 Fingerbuckers in Hingoli Lok Sabha MPs | हिंगोली लोकसभेवरून रंगले कार्यकर्त्यांमध्ये फेसबूकवॉर

हिंगोली लोकसभेवरून रंगले कार्यकर्त्यांमध्ये फेसबूकवॉर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडी वगळता कोणाचाही उमेदवार जाहीर झाला नसल्याने जागा कोणत्या पक्षाला जाईल? उमेदवार कोण राहील? याबाबत फेसबूकवर चर्चा झडताना दिसत आहेत. त्यातच मतदारसंघ सेनेऐवजी भाजपला सुटल्याच्या चर्चांनी वातावरण अधिकच गढूळ झाले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाची रचना आधीच विचित्र आहे. विदर्भातील दोन तालुके, नांदेड जिल्ह्यातील चार अन् हिंगोलीचे पाच अशा ११ तालुक्यांचा विस्तार. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीपर्यंत तर इच्छुकांची एवढी मांदियाळी होती की, सर्वच पक्ष इच्छुकांना कसे समजवायचे या विवंचनेत होते. मात्र आचारसंहिता लागू झाली अन् अनेकांनी तलवार म्यान केली. काहींनी उगाचच खळखळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार अजूनही निश्चित होताना दिसत नाही. खरेतर लढत द्यायची असेल तर सेनेने अगोदर उमेदवार जाहीर करणे क्रमप्राप्त होते. तसे तर झाले नाही. मात्र आज नवीनच चर्चांना तोंड फुटले. भिवंडीची जागा सेनेला देवून हिंगोलीची जागा भाजप घेणार असल्याच्या वावड्या उठत होत्या. ही बाब फेसबूकवरही झळकत आहे. त्यात अ‍ॅड.शिवाजी जाधव व आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या उमेदवारीचीही चर्चा होत होती. मात्र दुसरीकडे सातव लढणार नसल्याच्या काही वाहिन्यांच्या बातम्यांचा दाखला देत जाधव हे काँग्रेसचे उमेदवार असल्याचे काहीजण सांगत सुटले होते. अशातच हिंगोलीची जागा भाजपलाच सुटली अन् आयएएस राहिलेले राधेश्याम मोपलवार हे उमेदवार असल्याच्या वावड्याही सायंकाळी सुरू झाल्या.
या मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान खा.राजीव सातव यांचा दावा मजबूत असल्याने त्यांच्याऐवजी इतर कोणाचा विचार त्यांच्या संमतीशिवाय होणे शक्य वाटत नाही. मात्र काँग्रेसचा उमेदवार बदलतो की काय? अशा द्विधेत सेनेकडूनही उमेदवारी निश्चित होताना दिसत नाही. त्यात आता थंड बसलेली भाजपीय मंडळी पुन्हा जागी झाली आहे. भिवंडीचा दाखला देवून तेही पुन्हा जागेवर दावा करू लागले आहेत. त्यामुळे अशी प्रचंड रोमांचक स्थिती निवडणुकीचा फड रंगण्यापूर्वीच निर्माण झाली आहे. निवडणुकीला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यावर तर कशा व किती वेगवान घडामोडी घडतील, हे सांगणेच अवघड आहे.

Web Title:  Fingerbuckers in Hingoli Lok Sabha MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.